घोरवड घाटात ५०० फूट खोल दरीत मालट्रक कोसळला
By Admin | Published: February 9, 2016 11:54 PM2016-02-09T23:54:36+5:302016-02-09T23:56:59+5:30
घोरवड घाटात ५०० फूट खोल दरीत मालट्रक कोसळला
सिन्नर/पांढुर्ली : सिन्नर - घोटी मार्गावर पांढुर्लीजवळील घोरवड घाटात बिअरचे बॉक्स घेऊन जाणारा मालट्रक सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळला. चालक व क्लीनरने मालट्रक दरीत कोसळण्यापूर्वीच उड्या मारल्याने ते बचावले. मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.
औरंगाबाद येथून किंगफिशर कंपनीच्या बिअरचे बॉक्स घेऊन मालट्रक (क्र. एमएच २० डीई २११६) हा मुंबईकडे निघाला होता. सिन्नरकडून तो घोटीकडे जात असताना पांढुर्लीजवळील घोरवड घाटात पहाटे ३ वाजेच्या सुमारास तो दरीत कोसळला. समोरील वाहनाच्या प्रखर प्रकाश-झोतामुळे ताबा सुटून ट्रक दरीत गेल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले.
चालक हृषीकुमार भरतलाल शहा (२३) व क्लिनर या दोघांनी प्रसंगावधान राखत ट्रक दरीत जात असल्याचे पाहून उड्या टाकल्या. त्यामुळे ते सुदैवाने बचावले. त्यात चालक हृषीकुमार शहा याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात मालट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मालट्रक दरीतून बाहेर काढणे अतिशय जिगरीने बनले आहे. ट्रकमध्ये बिअरचा नेमका किती रुपयांचा माल होता याबाबत मालक आल्यानंतरच बिलावरून माहिती समजू शकेल. तथापि, त्यात ५ ते ७ लाख रुपयांचा बिअरचा माल असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक डी.बी. कोकरे, हवालदार एम. एम. देशमुख, एल. पी. धकाते, बी. के. झणकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ट्रक सुमारे ५०० फूट खोल दरीत असल्याने मंगळवारी सायंकाळपर्यंत तो दरीतून काढण्यात आला नव्हता. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)