‘मविआ’त विकासनिधीसाठी आमदारांची घुसमट : सुहास कांदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 01:42 AM2022-07-08T01:42:24+5:302022-07-08T01:43:00+5:30
मतदारसंघातील विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीत अनेक झारीतले शुक्राचार्य आडवे येत होते. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या आमदारांचा जीव विकास निधीसाठी घुसमटत होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे या समस्या अनेकदा मांडल्या. मातोश्रीशी असलेली नाळ तुटू नये यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण यश आले नसल्याची खंत शिवसेना बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्यक्त केली.
नांदगाव : मतदारसंघातील विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीत अनेक झारीतले शुक्राचार्य आडवे येत होते. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या आमदारांचा जीव विकास निधीसाठी घुसमटत होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे या समस्या अनेकदा मांडल्या. मातोश्रीशी असलेली नाळ तुटू नये यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण यश आले नसल्याची खंत शिवसेना बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्यक्त केली.
राज्यात शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर नांदगाव मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे बुधवारी (दि. ६) शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन आपल्या मतदारसंघात रात्री उशिराने परतले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी कुठलाही जल्लोष अथवा स्वागत करू नये, अशा सूचना कांदे यांनी दिल्याने कांदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी समर्थक, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कांदे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. कांदे म्हणाले, परिवर्तनाचा क्षण सुखाचा असला तरी त्यात एक दर्द आहे. यापुढे मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढायचा आहे. मनमाडची पाणीपुरवठ्याची करंजवन योजना केवळ तत्कालीनमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकवर्गणीचा १५ कोटींचा अडसर दूर केल्याने मार्गी लागू शकली. मनमाड नगर परिषदेला हा पैसा भरणे अशक्य होते. मतदारसंघातील विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीत अनेक झारीतले शुक्राचार्य आडवे येत होते, असा आरोपही कांदे यांनी केला. यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, राजेंद्र जगताप, सूर्यवंशी, राजेंद्र देशमुख, राजू जगताप, विलास आहेर, विष्णू निकम, अनिल रिंढे, कोठारी यांनीही मनोगत व्यक्त केले.
इन्फो
बाळासाहेबांचे छायाचित्र वापरणार
मुंबई सोडली तेव्हा २० आमदार सोबत होते. बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष असल्याने त्यांचे छायाचित्र आम्हाला फलकावर वापरता येणार आहे. पुढच्या कायदेशीर लढाईत धनुष्यबाण हे चिन्हदेखील आम्हाला नक्कीच मिळेल, असा विश्वासही कांदे यांनी व्यक्त केला. मतदारसंघात हाताच्या बोटावर असलेली शिवसैनिकांची नाराजी ही ‘विशिष्ट’ महत्त्वाकांक्षेतून आली आहे. राष्ट्रवादीची हवा खाऊन आलेल्यांनी मला शिवसेना शिकवायला निघाले आहेत. ज्यांचे काही कारणांमुळे गैरसमज झाले असतील त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू, असेही कांदे यांनी स्पष्ट केले.