मुंडे बचाव : ‘वॉक फॉर कमिश्नर’ला पोलिसांचा ‘रेड सिग्नल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:16 PM2018-08-30T22:16:11+5:302018-08-30T22:17:02+5:30
नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना जेमतेम बोटावर मोजण्याइतके महिने झाले असताना सत्ताधारी भाजपा सरकारने त्यांच्याविरोधात षडयंत्र रचून अविश्वास ठराव पारित करण्यासाठी महासभा बोलविल्याचा आरोप करत शहरातील विविध सामाजिक संघटनांसह, डाव्या, पुरोगामी संघटना व नाशिककरांनी सोशल मीडियावर उभारलेल्या चळवळीनंतर ‘वॉक फॉर कमिश्नर’ असा मोर्चा काढण्यात येणार होता; मात्र या मोर्चाला मुंबईनाका पोलिसांनी लेखी स्वरुपात परवानगी नाकारली आहे. ‘आम्ही नाशिककर’ म्हणून एकत्र आलेल्या संयोजकांनी लोकशाहीत मोर्चा काढण्याचा अधिकार असल्याचे सांगत नियोजीत वेळेत मोर्चा नियोजित ठिकाणावरुन आज निघणार असल्याचे स्पष्ट केले.
मंगळवारी (दि.२८) संध्याकाळी शासकिय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ‘वॉक फॉर कमिश्नर’ असा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापालिकेची सूत्रे हाती घेऊन मुंढे यांना सात महिन्यांचा कालावधी झाला आहे. मुंढे यांना नाशिकच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नाशिकला पाठविले; मात्र सत्ताधारी भाजपा मुंढे यांच्याविरोधात का? असा सवाल यावेळी बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. यानुसार मुंबईनाका पोलीस ठाण्याकडे परवानगी अर्ज संयोजकांकडून सादर करण्यात आला होता. या अर्जाला वरिष्ठ पोलीस निरिक्षक कारंजे यांनी लेखी उत्तर देत परवानगी नाकारली आहे. यामुळे मोर्चाबाबत संभ्रम निर्माण झाला असला तरी संयोजकांनी मोर्चा नियोजित अनंत कान्हेरे मैदानावरुन उद्या सकाळी दहा वाजता काढण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.