अतुलनीय शौर्य दाखवत शहीद झालेल्या जवानाला कन्यारत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 01:10 PM2018-11-19T13:10:28+5:302018-11-19T13:14:07+5:30
पाकने केलेल्या गोळीबारात सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथील केशव सोमगीर गोसावी हे शहीद झाले होते.
नाशिक- पाकने केलेल्या गोळीबारात सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथील केशव सोमगीर गोसावी हे शहीद झाले होते. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालणारे नाईक केशव सोमगीर गोसावी (२९) हे भारतीय लष्कराचे जवान पाकने केलेल्या गोळीबारात रविवारी शहीद झाले.
मराठा लाइट इन्फन्ट्रीमधील केशव मूळचे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील श्रीरामपूर (शिंदेवाडी) गावचे होते. मराठा लाइट इन्फन्ट्रीची तुकडी गस्त घालत असता शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकच्या बाजूने ‘स्नायपर’ हल्ला झाला. त्यात केशव हे शहीद झाले. भारतीय लष्कराने या हल्ल्याला उत्तर देऊन पाकिस्तानी चौक्यांचे नुकसान केले. या हल्ल्यात जवान केशव गोसावी यांना गोळी लागून ते जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले असता, अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या हजारो नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.
ज्यावेळी ते शहीद झाले, तेव्हा त्यांची पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती होती. त्या शहीद जवानाच्या पत्नीला कन्यारत्न झालं आहे. अपत्याला लष्करात भरती करण्याचं स्वप्न केशव गोसावी यांनी उराशी बाळगलं होतं. परंतु स्वप्न पाहणाऱ्या केशव गोसावी यांना मुलीच्या जन्माच्या आठवड्याआधीच वीरमरण आलं. घरातला कर्ता पुरुष गमावल्यानंतर गोसावी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आठ दिवसांनी का होईना त्यांच्या घरात काहीसं आनंदाचं वातावरण आहे. गोसावी यांच्या कुटुंबीयांना सरकारनं 25 लाखांची मदतही जाहीर केली आहे.