जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाºयास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:05 AM2017-09-16T00:05:34+5:302017-09-16T00:07:57+5:30
नाशिक : खंडणीची मागणी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी देवीदास नामदेव चंदनशिवे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूचित्रा घोडके यांनी शुक्रवारी (दि़१५) यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी तर सरकारी वकील म्हणून विद्या जाधव यांनी न्यायालयात काम पाहिले़
भद्रकाली परिसरातील हॉटेल चित्रकुट समोर १ डिसेंबर २०१० मध्ये सकाळी दहा वाजेच्या सुमारास इमरान सुलेमान हुडा हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते़ त्यांना आरोपी देवीदास नामदेव चंदनशिवे व त्यांच्या साथीदारांनी रस्त्यात अडवून खंडणीची मागणी केली़ तसेच इमरानच्या छातीवर व पोटावर चॉपरने वार करून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात देवीदास चंदनशिवे, संदीप चौधरी यांच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला होता़
न्यायाधीश घोडके यांच्या न्यायालयात अॅड़विद्या जाधव यांनी साक्षीदार तपासून आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध केला़ त्यानुसार घोडके यांनी चंदनशिवे यास पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास तर दुसरा आरोपी संदीप चौधरी यास दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली़