नाशिक शहरातील ३८ अनधिकृत टेरेस हॉटेल्सला महापालिकेकडून नोटीसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 06:57 PM2018-01-11T18:57:57+5:302018-01-11T18:59:38+5:30
नगररचनाचे सर्वेक्षण : अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू
नाशिक : मुंबईतील लोअर परेलमधील कमला कम्पाउंडमधील हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने अनधिकृत हॉटेल्सविरोधी धडक मोहीम सुरू केली असताना नाशिक महापालिकेच्याही नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहरात नियमबाह्य अनधिकृतपणे इमारतीच्या टेरेसवर थाटलेली ३८ हॉटेल्स निदर्शनास आली आहेत. त्यानुसार, अतिक्रमण विभागाने संबंधित हॉटेल्सला नोटीसा बजावल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली आहे.
मुंबईतील आगीच्या दुर्घटनेत १४ निष्पाप जिवांचे बळी गेले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने अनधिकृत हॉटेल्सविरोधात कारवाई आरंभली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातही कारवाई सुरू करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. दरम्यान, मुंबईतील घटनेनंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील सहाही विभागात केलेल्या सर्वेक्षणात इमारतीच्या टेरेसवर अनधिकृतपणे चालविली जाणारी ३८ हॉटेल्स निदर्शनास आली आहेत. त्यामध्ये, नाशिक पश्चिम विभागातील हॉटेल प्लेअर अॅण्ड बार, एम.डी. सफायर, रूफ टेक हॉटेल,व्हायटेक्स हॉटेल अॅण्ड बार, एन्टर द ड्रॅगन, फर्माइश हॉटेल, हॉटेल पतंग, हॉटेल याहू, कोपा कबाना हॉटेल, हॉटेल मनोरथ, हॉटेल २१ सेंच्युरी, बार्बी क्यू बिस्ट्रो, हॅप्पी नाशिक टाईम्स, टॉक आॅफ दी टाऊन, डी सेलर टेरेस हॉटेल, टेरेस हॉटेल सम्राट, पंचवटी विभागातील हॉटेल न्यू पंजाब, हॉटेल प्रेस्टीज पॉर्इंट, हॉटेल मजा, हॉटेल कारवा आणि हॉटेल राऊ, सिडको विभागातील शिवसागर, सुयोग हॉटेल, साई राज दरबार, साई विजय, न्यू पद्मा हॉटेल, पाथर्डी परिसरातील हॉटेल पोर्टीको, हॉटेल हेमराज व बार रेस्टॉरंट, हॉटेल द पाल्म, हॉटेल सेलिब्रेशन, हॉटेल ग्रॅण्ड आश्विन, नाशिकरोड विभागातील हॉटेल श्रद्धा, हॉटेल नालंदा, स्कायबार आणि गायकवाड क्वालिटी फूडस्, नाशिक पूर्व विभागातील हॉटेल कामत या हॉटेल्सचा समावेश आहे. नगरपालिकेने सदर हॉटेल्सचा केलेला सर्व्हे आता अतिक्रमण विभागाकडे पुढील कार्यवाही पाठविला असून अतिक्रमण विभागानेही संबंधितांना नोटीसा बजावल्या आहेत. मुदतीत संबंधितांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम हटवले नाही तर अतिक्रमण विभागामार्फत कारवाई केली जाणार असल्याचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी स्पष्ट केले आहे.
स्वत:हून बांधकाम हटविण्यास सुरूवात
अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, टेरेसवर थाटलेल्या एकही हॉटेल्सने आग प्रतिबंधक उपाययोजनेसंबंधी परवानगी घेतलेली नाही, तर नगररचना विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकाही हॉटेल्सला नगररचना विभागाने परवानगी दिलेली नाही. महापालिकेने आता नोटीसा बजावण्यास सुरुवात केल्यानंतर संबंधित हॉटेल्सचालकांची धावपळ उडाली असून काही चालकांनी स्वत:हून बांधकाम काढून घेण्यास सुरूवात केल्याची माहिती आहे.