प्रादेशिक परिवहन कार्यालयात शुक्रवारपासून आॅनलाईन सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 02:09 PM2017-11-29T14:09:15+5:302017-11-29T14:15:18+5:30
वाहनधारकांना वाहनांविषयीचे काम आता लवकर, सुलभदायी व घरबसल्या शक्य होणार
नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटगिरीचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी येत्या शुक्रवार (दि. १) पासून आरटीओ कार्यालयात मिळणा-या सेवांपैकी तब्बल ३२ सेवा हया आॅनलाईन होणार आहे. शुक्रवारी या आॅनलाईन कार्यप्रणालीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आॅनलाईन सेवा सुरू केली जाणार असल्याने वाहनधारकांना वाहनांविषयीचे काम आता लवकर, सुलभदायी व घरबसल्या शक्य होणार आहे. विशेष म्हणजे आरटीओ कार्यालयातील एजंटगिरीला काही प्रमाणात आळा या आॅनलाईन कार्यप्रणालीमुळे मिळण्याची शक्यता आहे.
या आॅनलाईन कार्यप्रणालीत शिकाऊ लायसन्ससह ना हरकत दाखला या प्रमाणपत्र सुविधांचाही समावेश करण्यात आलेला आहे. वाहन नुतनीकरण, मालकी हक्क हस्तांंतरण, बॅँकेचा बोजा चढविणे, उतरविणे तसेच ना हरकत प्रमाणपत्र या सुविधा वाहनधारकांना मिळणार आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनधारकांना वाहनांसंबंधीचे कामे करण्यासाठी अनेकदा वेळ खर्च करून चकरा माराव्या लागतात त्यातच बहुतांशी कामे ही आरटीओतील एजंटच्या माध्यमातूनच होत असल्याने वाहनधारकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. मात्र आता आॅनलाईन कार्यप्रणालीमुळे वाहनधारकांची डोकेदुखी थांबणार आहेच शिवाय एजंटगिरीलाही चाप बसणार आहे.