१४किलो चांदीच्या भांड्यांवर परप्रांतीय भाडेकरुने नाशिकमध्ये मारला डल्ला; राजस्थानला पोबारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 03:00 PM2018-01-11T15:00:40+5:302018-01-11T15:03:33+5:30
विनायक अपार्टमेंटमधील सदनिकेत १४ किलो भांड्यांची पिशवी ठेवून प्रकाशसोबत डिसेंबरच्या ४ तारखेला राजस्थान गाठले.
नाशिक : शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील विक्रीकर भवनाच्या भागातील विनायक अपार्टमेंटमधील सदनिकेत भाडेतत्त्वावर राहणा-या एका परप्रांतीय भामट्याने ओळखीचा गैरफायदा घेऊन राजस्थान येथील व्यावसायिकाची १४ लाख ५० हजाराच्या चांदीच्या भांड्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुकेश तेजाराम माली उर्फ मिठालाल माली (३३ रा. पाडीव, जि.सिरोही राजस्थान) यांचा चांदीच्या तयार भांड्यांच्या विक्रीचा व्यवसाय आहे. ते आंध्रप्रदेश राज्यात व्यवसाय करतात. त्यांच्याकडे कामाला असलेल्या कपिल नावाच्या व्यक्तीद्वारे त्यांची प्रकाशसोबत ओळख झाली. आंध्रप्रदेश येथून नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रकाशच्या राहत्या घरी विनायक अपार्टमेंटमधील सदनिकेत १४ किलो भांड्यांची पिशवी ठेवून प्रकाशसोबत डिसेंबरच्या ४ तारखेला राजस्थान गाठले. राजस्थानला पोहचल्यानंतर दहा ते बारा दिवस तेथे राहिल्यानंतर पुन्हा ते व्यवसायासाठी नाशिकला येण्यास निघाले असता प्रकाशने माली यांच्यासोबत येण्यास नकार देत तुमचे भांडे हे तेथील एका दुकानामध्ये आहे, असे सांगितले. माली हे नाशिकला आले असता सदर दुकानदाराकडे विचारणा केली तर त्याने तसे काहीही आमच्याकडे त्याने ठेवलेले नाही, असे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर माली यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून संशयित प्रकाश फाउलाल देवाक्षी (पामेरा गाव,जि.सिरोही राजस्थान) विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक बोडके करीत आहे.