पावणेसहा लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:11 AM2017-07-28T00:11:12+5:302017-07-28T00:11:32+5:30
दमदार पावसाने दिलासा : आॅगस्टला होणार शंभर टक्के पेरण्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या काही दिवसांच्या दमदार हजेरीनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने खरीप पेरण्यांना वेग आला आहे. खरिपाच्या एकूण ६ लाख ५२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ५ लाख ७३ हजार ७७३ हेक्टर (८७. ९३) क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मका पिकाच्या सर्वाधिक २ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. नांदगाव व देवळा तालुक्यात शंभर टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
भात पिकाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ६६ हजार ७०० हेक्टर असून, त्यापैकी ५९ हजार २९९ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. खरीप ज्वारीचे ३ हजार ९०० लागवडीचे क्षेत्र असून, त्यापैकी अवघ्या २६७ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत. खरीप बाजरीचे १ लाख ६० हजार २०० हेक्टर सरासरी लागवडीखालील क्षेत्र असून, त्यापैकी १ लाख १५ हजार २६३ हेक्टर क्षेत्रावर खरीप बाजरी पिकाची पेरणी आटोपली आहे. नागली पिकाचे क्षेत्र ३५ हजार ३०० हेक्टर असताना प्रत्यक्षात १६ हजार ६७१ हेक्टर क्षेत्रावर नागली रोपांची लागवड झाली आहे. मका पिकाचे १ लाख ७३ हजार हेक्टर सरासरी लागवडीखालील क्षेत्र असताना प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त २ लाख १० हजार ५२४ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत.
तूर पिकाचे १० हजार ४०० हेक्टर लागवडीचे क्षेत्र असताना प्रत्यक्षात ९ हजार १११ हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड झाली आहे. उडीद पिकाचे १४ हजार ७०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी १० हजार ३२९ हेक्टर क्षेत्रावर उडीद पिकाच्या पेरण्या झाल्या आहे. मुगाचे १० हजार ३०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी ८ हजार २५७ हेक्टर क्षेत्रावर मुगाच्या पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक लागवडभुईमूग पिकाचे ३१ हजार ३०० हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात २३ हजार ३३० हेक्टर क्षेत्रावर भुईमूग पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीन पिकाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ५७ हजार हेक्टर असून, त्यापेक्षा जास्त ५९ हजार ५७७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत.