नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील स्वाईन फ्ल्यू कक्षात वाढले रुग्ण : हवामान बदलाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 15:54 IST2017-12-18T15:51:59+5:302017-12-18T15:54:22+5:30
स्वाइन फ्लू कक्षात सध्या पेठ तालुक्यातील ६८ वर्षीय व्यक्तीसह सातपूर, चांदोरी गावातील दोन महिला तसेच निलगिरी बाग पंचवटी परिसरातील एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर उपचार सुरू आहेत.

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील स्वाईन फ्ल्यू कक्षात वाढले रुग्ण : हवामान बदलाचा परिणाम
नाशिक : बदलत्या हवामानामुळे स्वाइन फ्लू आजाराने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली असून, जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्वाइन फ्लू नियंत्रण कक्षात स्वाइन फ्लूसदृश रुग्णांची संख्या वाढत असून, इगतपुरी तालुक्यातील एका रुग्णाच्या तपासणीचे नमुने सकारात्मक आल्याने त्यास स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात रविवारी (दि.१७) पाच रु ग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील इगतपुरीतील ५५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आला आहे.
स्वाइन फ्लू कक्षात सध्या पेठ तालुक्यातील ६८ वर्षीय व्यक्तीसह सातपूर, चांदोरी गावातील दोन महिला तसेच निलगिरी बाग पंचवटी परिसरातील एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर उपचार सुरू आहेत. या चौघांचेही ‘स्वॅब’चे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. दरम्यान, वातावरणातील बदलामुळे स्वाइन फ्लूचा धोका वाढल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केले आहे.