पिळकोस पुलाचा भराव गेला वाहून
By admin | Published: August 4, 2016 12:56 AM2016-08-04T00:56:50+5:302016-08-04T00:57:31+5:30
पिळकोस पुलाचा भराव गेला वाहून
पिळकोस : कळवण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधारेने गिरणा नदीवरील पिळकोस - बगडू पुलाचा भराव वाहून गेला. या ठिकाणी मोठे भगदाड पडले असून, अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त आहे.
बगडू-बेज बाजूकडील डोंगरावरील पावसाचे सर्व पाणी उतारामुळे राज्य महामार्ग क्र. १७च्या रस्त्यावरून नदीकडे प्रवाहित होत असल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या समोरील उतारावरील रस्त्याच्या कडेचा भराव वाहून गेला असून, त्या ठिकाणी
खड्डा पडला आहे व रस्त्यालाही पावसाच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे काप लागली असून, दोन्ही बाजूला भगदाड पडण्यास सुरुवात झाली आहे.
यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने या रस्त्याला कायमस्वरूपी टिकाऊ असा भराव करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
पावसाळ्यात या पुलावर उताराचे पाणी येते व त्याबरोबर गाळही वाहून येतो; परंतु संबंधित विभागाकडून रस्त्याला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारी केल्या गेल्या नसल्यामुळे वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जात आहे तरी संबंधित विभागाने या रस्त्याला कायमस्वरूपी दगडी भराव करून रस्ता वाहतुकीस योग्य करावा व पुलाच्या दोन्हीही बाजूच्या रस्त्याला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारी कराव्यात, अशी मागणी बाळासाहेब अहेर, राहुल सूर्यवंशी, मंगेश अहेर, राहुल अहेर, युवराज शिंदे, अनिल जाधव, श्रीधर वाघ यांनी केली आहे. (वार्ताहर)