मोदींना मनीऑर्डर पाठवली, 'त्या' कांदा उत्पादक शेतकऱ्याची पीएमओने दखल घेतली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:13 PM2018-12-04T17:13:48+5:302018-12-04T17:14:49+5:30
नाशिकच्या निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक संजय साठे यांना नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला.
नवी दिल्ली - कांद्याला प्रति क्विंटल 100 ते 200 रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाणी आले आहे. तर, कित्येक शेतकऱ्यांनी आपल्या कांदा बाजार समितीमध्ये नेण्याऐवजी शेतातच सडून दिला. त्यातच, नाशिकमधील एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाकांदा विकून मिळालेल्या पैशांचे मनीऑर्डर केले होते. आता, पीएमओ कार्यालयाने या शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल घेतली आहे.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक संजय साठे यांना नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातून साठे यांना कांदा उत्पादन अन् विक्रीसंदर्भात माहिती विचारण्यात आली. साठे यांनी 7.5 क्विंटल कांदा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला होता. त्यावेळी, साठेंना प्रति क्विंटल 150 रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळाला. उत्पादन खर्च तर सोडाच, पण वाहतूक अन् हमाली खर्चही या पैशांतून वसुल होईना. त्यामुळे संतापलेल्या साठे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच कांद्यातून मिळालेले 1064 रुपये मनीऑर्डरने पाठवले होते. त्यानंतर पीएमओ कार्यालयाने या मनिऑर्डरची दखल घेतली आहे.
पीएमओ कार्यालयाने साठे यांच्या तक्रारीची दखल घेत, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला फोन करुन संदर्भात माहिती मागविली आहे. त्यामुळे आता तरी शेतकरी साठे यांना आणि राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून काही दिलासा मिळेल, अशी आशा पल्लवीत झाली आहे.