पोलीस सुस्त : मालेगावी कॅम्पातील सोमवार बाजारात धुडगूस
By admin | Published: February 18, 2015 11:59 PM2015-02-18T23:59:46+5:302015-02-18T23:59:55+5:30
तृतीय पंथीयांची दादागिरी; शेतकरी त्रस्त
मालेगाव : येथील कॅम्प भागात सोमवारी सायंकाळी भरणाऱ्या भाजी बाजारात तृतीय पंथीयांकडून होणाऱ्या दादागिरीला शेतकऱ्यांसह महिला त्रस्त झाल्या आहेत. सोमवारी (दि. १६) या बाजारात पैसे देण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याने तो गंभीर झाल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील कॅम्प परिसरातील मराठी शाळेच्या आवारात दर सोमवारी सायंकाळी आठवडे बाजार भरतो. या बाजारात महिला भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करतात. त्यामुळे परिसरातील ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला विक्री करण्यासाठी आणतात. या शेतकऱ्यांवर तृतीय पंथीय दादागिरी करत असून, त्यांच्याकडून पैसे किंवा मालाच्या माध्यमातून वसुली करतात. एखाद्या शेतकऱ्याने त्यांना विरोध केला असता त्याच्या मालाची नासधूस करत मारहाण करण्याचे प्रकार नियमित घडतात. गेल्या सोमवारी सायंकाळी एका शेतकऱ्याने
त्यांना विरोध केला असता त्या शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली.
पोलीस ठाण्याच्या आवारात मारहाण सुरू असतानाही पोलिसांनी वेळेत लक्ष न दिल्याने या मारहाणीत शेतकरी जखमी झाला. त्यावेळी महिलांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होऊन त्यांनी घराकडे जाण्यासाठी गर्दी केली. यावेळी पोलीस ठाण्याकडे जाणारा रस्ता संरक्षक जाळ्या लावून बंद करण्यात आला. त्यामुळे बाहेर पडण्याच्या एकाच मार्गावर कोंडी झाली होती. त्यात भुरट्या चोरांनी चार ते पाच महिलांचे दागिने ओरबाडण्याची घटना घडली. यातील काही महिला दागिने चोरीला गेल्याने घरच्यांचा जाच सहन करावा लागेल या भीतीने जागेवर रडत बसल्याचे प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले.
हा बाजार पोलीस ठाणे असलेल्या इमारतीच्या परिसरात भरत असतानाही दरवेळी शेतकऱ्यांचा माल, पैसे आदि वस्तूंसह महिलांचे दागिने, पर्स, मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याचे प्रकार घडतात. त्यांचा बंदोबस्त करण्यापेक्षा पोलीस संरक्षक जाळ्या लावून पोलीस ठाणे सुरक्षित करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)