नदीत जाणारे प्रदूषित पाणी तातडीने रोखणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:26 AM2018-03-24T00:26:43+5:302018-03-24T00:26:43+5:30
गोदावरी व नंदिनी नदीत होणारे प्रदूषण व नदीत जाणाऱ्या गटारीच्या पाण्याकडे मनपाचे होणारे दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त करताना सहा महिन्यांत गटारीचे पाणी दोन्ही नदीत जाणार नाही याबाबत कारवाई करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले.
नाशिक : गोदावरी व नंदिनी नदीत होणारे प्रदूषण व नदीत जाणाऱ्या गटारीच्या पाण्याकडे मनपाचे होणारे दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त करताना सहा महिन्यांत गटारीचे पाणी दोन्ही नदीत जाणार नाही याबाबत कारवाई करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले. याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या कार्यकारी अभियंता संजय घुगे यांना दिले या नदी प्रदूषणासंदर्भात आमदार देवयानी फरांदे व सीमा हिरे यांनी विचारलेल्या विधी मंडळात उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंघाने विधानभवन येथे झालेल्या बैठकीत कदम यांनी हे आदेश दिले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून आमदार वारंवार पाठपुरावा करत असताना अधिकारी वर्गाचे सातत्याने दुर्लक्ष होत असले बाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. दोन महिन्यांत सातपूर व अंबड येथे गटार व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करून देणे कामी सूचना औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना देण्याचे अन्यथा कारवाही करण्याचे आदेश त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव डॉ. अनबलगन यांना दिले. या बैठकीस अवर मुख्य सचिव गवई, डॉ. अमर सुपाते, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे संचालक डॉ. पाटील, प्रादेशिक अधिकारी आर. यू. पाटील आदी उपस्थित होते.
सहा महिने मुदत
सहा महिने ही अखेरची मुदत असून, त्यात कोणत्याही परिस्थितीत वाढ होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सातपूर औद्योगिक वसाहतीत २७४ कारखाने व अंबड औद्योगिक वसाहतीत ४०४ कारखाने सुरू असताना औद्योगिक विकास महामंडळाने गटारीची व्यवस्था केलेली नाही हे गंभीर असल्याचे कदम यांनी सांगितले.