राहुल गांधी अध्यक्षपद सोडण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 06:41 AM2019-05-25T06:41:08+5:302019-05-25T06:41:26+5:30
काँग्रेस कार्यकारिणीची आज होणार बैठक
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवामागील कारणांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या, शनिवारी बैठक होत आहे. या वेळी पराजयाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी आपल्या पदाचा राजीनामा कार्यकारिणीसमोर सादर करण्याची शक्यता आहे.
पराभवाची जबाबदारी स्वीकारून काही राज्यांतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी भविष्यकाळात काय उपाय योजता येतील, यावरही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होईल. लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला फक्त ५२ जागांवर विजय मिळाला. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत या पक्षाला फक्त ४४ जागा मिळाल्या होत्या.
राज बब्बर यांनी दिला राजीनामा
उत्तर प्रदेशमध्ये ८० जागांपैकी फक्त एकच म्हणजे रायबरेलीची जागा काँग्रेसला जिंकता आली. तिथे यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी निवडून आल्या. तर अमेठीमध्ये राहुल गांधी यांचा पराभव झाला. फतेहपूर सिक्रीमध्ये या राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांना हार पत्करावी लागली. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राज बब्बर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा शुक्रवारी सादर केला. राहुल गांधी यांच्या पराभवामुळे अमेठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष योगेंद्र मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.