जुन्या नाशकात प्रचारात कव्वाली अन् भक्तिगीते
By admin | Published: February 16, 2017 11:25 PM2017-02-16T23:25:57+5:302017-02-16T23:26:09+5:30
उमेदवारांची शक्कल : परिसर बदलला की ‘धून’ही बदलते
नाशिक : निवडणुकीचा माहोल रंगात आला असून, उमेदवारांकडून प्रभाग पिंजून काढण्यासाठी जिवाचे रान केले जात आहे. बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक राहिल्याने मतदारांपुढे स्वत:ची छाप पाडण्यासाठी उमेदवार विविध शक्कल लढवित आहेत. जुन्या नाशकात प्रचारात चक्क कव्वाली अन् भक्तिगीते वाजविली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरलेल्या उमेदवारांकडून प्रचारावर सर्वाधिक भर दिला जात आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बॅँकेतून रक्कम काढण्यावर मर्यादा जरी असली तरी ‘होऊ द्या खर्च...’ या उक्तीनुसार काही उमेदवार कामाला लागले आहेत. आचारसंहिता भरारी पथकांच्या वाहनांसोबतच विविध पक्षांच्या उमेदवारांचे प्रचाररथही प्रभागातून गतिमान झाल्याचे चित्र आहे.
प्रचार फेऱ्या काढून मतदारांचे लक्ष वेधण्याचा उमेदवार प्रयत्न करत असून, दुसरीकडे जुन्या नाशकात तर चक्क प्रचाररथांवर ‘एलईडी वॉल’ लावून प्रचार केला जात आहे. उमेदवाराची ‘ओळख’ अन् ‘आवाहन’ झाल्यानंतर मुस्लीम बहुल भागात वाहन असेल तर कव्वालीची ध्वनिफीत आणि हिंदू बहुल भागातून वाहन जात असेल तर भक्तिगीते वाजवून मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. प्रचारात कव्वाली अन् भक्तिगीतांचे संगीत सध्या जुन्या नाशकात चर्चेचा मुद्दा आहे. दाट लोकवस्ती, हिंदू-मुस्लिमांचा एकोपा अशी जुन्या नाशिकची थोडक्यात ओळख. जुन्या नाशिकने महापालिकेत अनेकदा नेतृत्व पाठविले; मात्र या भागाचा गावठाण परिसर आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे.
निवडणुका येतात आणि उमेदवारांकडून आश्वासन नव्हे तर चक्क ‘स्मार्ट जुने नाशिक’असे कायापालटचे स्वप्न दाखविले जाते; मात्र मतदानानंतर परिस्थितीत पुन्हा ‘जैसे थे’ चित्र निर्माण होते, अशी खंत येथील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.