जिल्ह्यात २२४ ‘सहस्त्रक’ मतदारांची नोंद५ जानेवारीला होणार जाहीर सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:59 AM2017-12-05T00:59:25+5:302017-12-05T01:06:25+5:30
नाशिक : एकविसाव्या शतकाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २००० रोजी जन्मलेल्या व सध्या सतरा वर्षे वयोगट असलेल्या जिल्ह्यातील २२४ ‘सहस्त्रक’ मतदारांची नोंद झाली असून, या सर्वांचा येत्या ५ जानेवारी रोजी सत्कार करण्यात येणार आहे.
एकविसाव्या शतकाच्या पहिल्याच दिवशी जन्मलेल्यांचे वय सध्या सतरा वर्षे आहे. १ जानेवारी २०१८ रोजी ते वयाची अठरा वर्षे पूर्ण करतील व त्यांना मतदानाचा हक्क मिळणार आहे. त्यामुळे त्यांना विशेष मतदार म्हणून संबोधण्यात यावे, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून, निवडणूक शाखेने सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेचा आधार घेत अशा मतदारांचा शोध घेतला असता त्यात २२४ व्यक्ती सापडल्या आहेत. या सर्वांची नावे ५ जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध होणाºया विधानसभा मतदार संघनिहाय मतदार यादीत समाविष्ट असणार असून, त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील २२४ सहस्त्रक मतदारांचा येत्या ५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनी सत्कार करण्यात येणार असून, त्यानंतर या सर्वांना निवडणूक आयोगाचा बॅच दिला जाईल व त्यांना ‘ब्रॅण्ड अॅम्बेसॅडर’ म्हणून नेमण्यात येईल. मतदार जागृती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे.