आरक्षणास विरोध; नागरिकांनी बांधकाम बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:42 PM2017-11-22T23:42:21+5:302017-11-23T00:41:08+5:30
महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर विकासकाकडून सुरू असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम स्थानिक नागरिकांनी विरोध करीत बंद पाडले. शहरातील आकाशवाणी टॉवरजवळ हे आंदोलन बुधवारी (दि. २२) करण्यात आले. या भूखंडाचे आरक्षण विकसित करण्यासाठी मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करीत शिवसेनेने आंदोलनाला पाठिंबा दिला आणि रस्त्यावर तसेच न्यायालयातही लढाई करण्याची तयारी दर्शविली.
नाशिक : महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर विकासकाकडून सुरू असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम स्थानिक नागरिकांनी विरोध करीत बंद पाडले. शहरातील आकाशवाणी टॉवरजवळ हे आंदोलन बुधवारी (दि. २२) करण्यात आले. या भूखंडाचे आरक्षण विकसित करण्यासाठी मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करीत शिवसेनेने आंदोलनाला पाठिंबा दिला आणि रस्त्यावर तसेच न्यायालयातही लढाई करण्याची तयारी दर्शविली. शहरातील गंगापूर रोडवरील मौजे नाशिक शिवारातील सर्व्हे नं. ७०५ यातील अंतिम भूखंडावर खेळाचे मैदान, क्रीडांगण आणि शॉपिंग सेंटरचे आरक्षण आहे. सदरचे आरक्षण एआर म्हणजेच समावेशक आरक्षणामार्फत विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तथापि, महापालिकेची आरक्षणे विकसित न करताच बिल्डर्स आपल्या सोयीने शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधत आहे. महापालिकेने त्याला खासगी विकासनासाठी रोडफ्रंट जागादेखील स्थलांतरित करून दिली आहे. तथापि, समावेश आरक्षणामुळे विकास आराखड्यातील आरक्षणाचा हेतू साध्य होत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. समावेशक आरक्षणाद्वारे बिल्डरांच्या सोयीने विकास केल्यास क्रीडांगण झाकले जाते तसेच त्यासाठी कमी जागा मिळते. गंगापूररोडवर महापालिकेच्या मालकीचे एकही मोठे क्रीडांगण नसून अशावेळी बिल्डरकडून आरक्षणाचा विकास अडचणीचा ठरणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा घोळ सुरूच असून, नागरिकांनी यासंदर्भात फाईली मागण्याचा प्रयत्न केल्यानंतरही महापालिका टाळाटाळ करीत आहे. माहितीच्या आधारेदेखील उत्तरे देत नाहीत. त्यातच बिल्डरने शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम सुरू केल्यानंतर येथील जॉगिंग ट्रॅकवर फिरणे कठीण झाले. त्यामुळे बुधवारी (दि. १२) सकाळी नागरिकांनी धरणे आंदोलन सुरू केले. किशोर शिरसाट, संजय खैरनार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते तसेच गटनेता विलास शिंदे यांनीदेखील येथे भेट देऊन पाठिंबा दिला. त्यानंतर नागरिकांनी बिल्डरचे सुरू असलेले बांधकाम बंद पाडले. आंदोलनात आनंदराव बोरसे, पंडितराव बिरारी, राजाराम टर्ले, सतीश मुसळे, मनोज देसले, चंद्रकांत भोई, सुशीला वाडीले, प्रियांका भोई, सविता सांगळे यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.