संजीवन समाधी सोहळा : ज्ञानेश्वरी पारायण, महाआरती संत ज्ञानेश्वर पालखी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:56 AM2017-11-17T00:56:03+5:302017-11-17T00:56:31+5:30
आकर्षक सजावट केलेले संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, माउलींचा जयघोष करणारे आबालवृद्ध भाविक, मंदिर परिसरात काढण्यात आलेली पालखी मिरवणूक, जागोजागी रांगोळ्यांसह औक्षण, फुले, प्रसाद अर्पण करीत होत असलेले स्वागत, कीर्तन, भजन, आरती, महाप्रसाद, सतारवादन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन अशा अपार उत्साहात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा पार पडला.
नाशिक : आकर्षक सजावट केलेले संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, माउलींचा जयघोष करणारे आबालवृद्ध भाविक, मंदिर परिसरात काढण्यात आलेली पालखी मिरवणूक, जागोजागी रांगोळ्यांसह औक्षण, फुले, प्रसाद अर्पण करीत होत असलेले स्वागत, कीर्तन, भजन, आरती, महाप्रसाद, सतारवादन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन अशा अपार उत्साहात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा पार पडला.
हुंडीवाला लेन येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात गुरुवारी (दि.१६) सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता करण्यात आली. ९ वाजता हुंडीवाला लेन येथून दहीपूल, नेहरू चौक, सोमवार पेठ, भद्रकाली कारंजा हुंडीवाला लेन या मार्गे माउलींच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. सर्व वारकरी भजनी मंडळांनी समाधी सोहळ्याच्या अभंगांचे गायन केले. दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी महिला भजनी मंडळाने गीतापाठ सादर केला. सायंकाळी डॉ. श्रीकृष्णबुवा सिन्नरकर यांचे ‘ज्ञानेश्वर महाराज समाधी व संतचरित्र’ विषयावर कीर्तन झाले. रात्री शाहीर परवेझ संगीत गुरुकुलच्या सदस्यांनी सतारवादन करीत सोहळ्यात मंगलमय असा अनोखा रंग भरण्याचा प्रयत्न केला. नीलेश शौचे, मंदार देव, सुधाकर गर्गे यांनी पूजन केले. दिवसभरात नगरसेवक शाहू खैरे, गुरुमित बग्गा आदी विविध मान्यवरांसह हजारो भाविकांनी मंदिरास भेट देत दर्शन घेतले.