श्रावणात होणार नाशकात सव्वालाख पार्थिव शिवलिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 03:19 PM2018-08-03T15:19:50+5:302018-08-03T15:23:00+5:30
१२ जूनपासून श्रावणमासाला प्रारंभ होत असल्याने संपूर्ण महिनाभर ९ सप्टेंबरपर्यंत सव्वालाख पार्थिव शिवलिंग तयार केले जाणार आहे. मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या पार्थिव शिवलिंगाची दैनंदिन पूजा व महाआरती करण्यात येणार आहे.
नाशिक : आडगाव नाक्यावरील श्रीकृष्णतीर्थ आश्रमातील श्री विश्वनाथ महादेव मंदिरात श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सव्वालाख पार्थिव शिवलिंग व महारुद्राभिषेक पूजन करण्यात येणार असल्याची माहिती श्रीकृष्णतीर्थ आश्रमाचे श्री १०८ स्वामी रामतीर्थजी महाराज यांनी दिली आहे.
रविवार, दि. १२ जूनपासून श्रावणमासाला प्रारंभ होत असल्याने संपूर्ण महिनाभर ९ सप्टेंबरपर्यंत सव्वालाख पार्थिव शिवलिंग तयार केले जाणार आहे. मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या पार्थिव शिवलिंगाची दैनंदिन पूजा व महाआरती करण्यात येणार आहे. श्रावण महिन्यात शंकराची उपासना केल्याने पुण्यप्राप्ती होते, अशी भाविकांची ख्याती असल्याने दरवर्षी आश्रमात महिला व पुरुष भाविक मातीपासून पार्थिव शिवलिंग तयार करतात. सकाळी ८ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते सायंकाळी ७ यावेळेत पार्थिव शिवलिंग तयार केले जाणार आहे. संपूर्ण महिन्याभरात तयार केलेल्या पार्थिव शिवलिंगाची श्रावण महिना समारोपाप्रसंगी ९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता श्रीकृष्ण तीर्थ आश्रम ते रामकुंडापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. श्रावणमासानिमित्त श्रीकृष्णतीर्थ आश्रमातील श्री विश्वनाथ महादेव मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या पार्थिव शिवलिंग व महारुद्राभिषेक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन रामतीर्थजी महाराज, सत्यगोविंद पाराशर यांनी केले आहे.