स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे नाशिक महापालिकेला विस्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 03:23 PM2017-11-25T15:23:34+5:302017-11-25T15:25:45+5:30
नाराजीचा सूर : तारांगण प्रकल्पात कार्यकर्त्यांकडून अभिवादन
नाशिक - महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व माजी केंद्रीयमंत्री आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनाचे महापालिकेला विस्मरण झाल्याने राष्ट्रवादी शहर कॉँग्रेससह चव्हाणप्रेमी कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण तारांगण प्रकल्पात साफसफाई करत चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी महापालिकेचाही निषेध करण्यात आला.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने महापालिकेने ‘तारांगण’ प्रकल्प उभारलेला आहे. शनिवारी (दि.२५) यशवंतरावांची पुण्यतिथी होती. परंतु, पुण्यतिथी असूनही तारांगण प्रकल्पात अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य आढळून आल्याने आणि महापालिकेला पुण्यतिथीचे विस्मरण झाल्याने राष्ट्रवादी शहर कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘तारांगण’ प्रकल्पावर जाऊन परिसरात साफसफाई केली आणि तेथील यशवंतरावांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश चिटणीस अर्जुन टिळे, सरचिटणीस संजय खैरनार, युवक कार्याध्यक्ष अँड चिन्मय गाढे, शंकर मोकळ, अनिल परदेशी, महेश भामरे, सुनील दातिर, चेतन कासव, राहुल पाठक, डॉ संदीप चव्हाण, सोपान कडलग आदी उपस्थित होते.
इन्फो
कार्यकर्त्यांना कटू अनुभव
यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी काही चव्हाण प्रेमी तरुण तारांगण प्रकल्पावर आले होते. यावेळी त्यांनाही पुतळ्याची रंगरंगोटी झालेली नसल्याचे आढळून आले. सदर कार्यकर्ते १२ मार्च रोजी जयंतीदिनीही अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळीही त्यांना अशीच परिस्थिती दिसून आली होती. आता पुण्यतिथीदिनीही महापालिकेकडून साधी साफसफाईही केली न गेल्याने तरुणांनी संताप व्यक्त केला. यापुढे पुतळ्यास रंगरंगोटी करणे जर महापालिका प्रशासनाला परवडणारे नसेल तर आम्ही दर जयंती व स्मृती दिनी पुतळ्यास रंगरंगोटी करू असा मानस यावेळी तरुणांनी व्यक्त केला. यावेळी गोरख ढोकने यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी भूषण काळे, कमलेश काळे, विक्रम गायधनी,जगदीश आहेर,शारीक शेख,आयुष पाटील आदी उपस्थित होते.
इन्फो
प्रशासनाचे स्पष्टीकरण
महापालिकेमार्फत महापुरुषांची जयंती साजरी केली जात असते. पुण्यतिथी दिनी कार्यक्रम घेतले जात नसल्याचे स्पष्टीकरण प्रशासकीय सूत्रांनी केले आहे. मात्र, साफसफाईबाबत संबंधित विभागिय अधिकाऱ्याना विचारणा केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.