गिरणा नदीकाठच्या शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:17 AM2018-02-27T00:17:10+5:302018-02-27T00:17:10+5:30
कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील गिरणा नदीकाठच्या शिवारात गेल्या आठ-दहा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रविवारी रात्री बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून ठार तर म्हशीला व पारडूला जखमी केले.
पिळकोस : कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील गिरणा नदीकाठच्या शिवारात गेल्या आठ-दहा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रविवारी रात्री बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून ठार तर म्हशीला व पारडूला जखमी केले. येथील शेतकरी महादू हरी खैरनार यांच्या वाड्यातील बांधलेल्या वारसावर बिबट्याने हल्ला करून ठार केले, तर म्हैस व पारडूला जखमी केले. यात खैरनार यांचे बरेच नुकसान झाले आहे. शेतकºयांनी कळवण वन विभागाला कळवले असता, वनकर्मचाºयांनी धाव घेत परिसराची पाहणी केली. मोकभणगीचे वनपरीमंडळ अधिकारी शशिकांत वाघ यांनी पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. आहेरराव यांनी जखमी पारडू व म्हशीवर उपचार करून वन विभागाला अहवाल सादर केला. वन विभागाच्या वतीने परिसरातील ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचा तसेच फटाके फोडण्याचा व घर-जनावरांच्या शेड, गोठ्यातील लाइट सुरू ठेवाव्याचे आवाहन वनपरीमंडळ अधिकारी शशिकांत वाघ, वनरक्षक डी. जे. भोये, वनमजूर विवेक पाटील यांनी केले आहे. परिसरात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. गिरणा नदीकाठ परिसरात व शिवारात रात्री व पहाटेच्या सुमारास अनेकांना बिबट्या व मादीचे दर्शन झाले असून, ग्रामस्थ व शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी चिंतामन बच्छाव, शिवाजी बच्छाव, सचिन खैरनार, विवेक बच्छाव, दौलत बच्छाव, सचिन पाटील, संदीप पाटील, विजय खैरनार, महादू खैरनार, भूषण बच्छाव, कैलास पाटील, उमेश बच्छाव यांसह परिसरातील शेतकरी व पशुपालकांनी केली आहे.
शेत शिवारात राहणाºया शेतकरी व शेतमजुरांनी, लहान मुलांनी सायंकाळनंतर घराबाहेर पडू देऊ नये. पाळीव जनावरे रात्री बंधिस्त गोठ्यात बांधावी व जनावरे असलेल्या ठिकाणीचे दिवे सुरू ठेवावे. मेंढपाळ व पशुपालकांनी परिसरात फटाके फोडावे. बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात लवकरच पिंजरा लावण्यात येईल.
- शशिकांत वाघ, वनपरीमंडळ अधिकारी, मोकभणगी