'मॉब लिचिंग'च्या निषेधार्थ हजारो मुस्लीम रस्त्यावर; पीडितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 01:27 PM2019-07-15T13:27:26+5:302019-07-15T13:27:53+5:30
मॉब लिचिंग विरोधी कायदा बनवावा, मॉब लिचिंगमध्ये बळी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
नाशिक : 'मॉबलिचिंग'सारख्या घटना गंभीर असून हे भारताला शोभणीय नाही व राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणणाऱ्या आहेत हे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदा करावा. मॉब लिचिंगच्या घटनेच्या सुनावणी जलदगती न्यायालयात व्हाव्यात तसेच आरोपींना फाशी किंवा जन्मठेप सारख्या शिक्षेची तरतुद करावी अशी मागणी बहुजन मुस्लिम संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली.
देशभरात झालेल्या मॉब लिंचीगच्या घटनांविरोधात समितीच्या वतीने नाशिक शहरातून जिल्हास्तरीय निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो मुस्लिम आणि बहुजन बांधव मोर्चात सहभागी झाले होते. राष्ट्रीय एकात्मतेसाठी, मानव जातीच्या कल्याणासाठी शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन खतीब यांनी दुवा पठन केली. त्यानंतर चौकमंडई येथून मोर्चास शांततेत सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी राष्ट्रीय ध्वज फडकवले. तसेच मॉब लिचिंग घटनेचा निषेध म्हणून मोर्चेकर्यांनी काळे झेंडे घेतले होते. भारत झिंदाबाद, संविधान झिंदाबाद, लोकतंत्र झिंदाबाद, हमारे भारत मे अमन ओ अमन कायम कर दे आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी अल्पसंख्यांक, दलितांना विशेष सुरक्षा द्यावी, मॉब लिचिंगच्या सुनावणी जलदगती न्यायालयात होऊन आरोपींना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा द्यावी. मॉब लिचिंग विरोधी कायदा बनवावा, मॉब लिचिंगमध्ये बळी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत, कुटूंबातील एकास सरकारी नोकरी देण्याची तरतुद करावी, खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अल्पसंख्यांक समुदायासाठी विशेष अॅक्ट्रोसिटी कायदा तयार करावा, शिक्षणातील आरक्षण तातडीने लागू करावे, जे राजकीय नेते, पदाधिकारी मॉब लिचिंग सारख्या घटनांचे समर्थन करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, मुस्लिम पर्सनला लॉ मध्ये सरकारचा हस्तक्षेप थांबवावा आदी मागण्या यावेळी मोर्चातून मांडण्यात आल्या. चौकमंडई येथून निघालेला मोर्चा दूधबाजार, खडकाळी, शालिमार सिग्नल, जिल्हा परिषद, त्र्यंबक नाका मार्गे इदगाह मैदानावर या मोर्चाची सांगता होऊन. त्यानंतर समितीच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार आहे
वाहतूक कोंडी
मोर्चात हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने मोर्चा मार्गात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. त्यात सीबीएस, खडकाळी, सारडा सर्कल, मुंबई नाका, गडकरी चौक, त्र्यंबकनाका आदी परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा फटका पर्यायी मार्गांवरील वाहतूकीस बसला. समितीच्या स्वयंसेवकांनी मोर्चा मार्गात नियोजनबद्धरित्या नागरिकांना मार्गदर्शन केले. स्वच्छता ठेवण्यासाठीही काही स्वयंसेवक तैनात होते. तसेच बंदोबस्तासाठी पोलीस फौजफाटाही तैनात होता.
पाहा व्हिडीओ -