अलबत्या-गलबत्यामधील वैभव मांगलेंच्या पडद्यामागील कलाकाराच्या बॅगा छूऽऽऽ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 02:40 PM2019-05-11T14:40:41+5:302019-05-11T14:43:00+5:30
विशेष म्हणजे, काही दिवसांपुर्वीच कालिदास कलामंदिराचे नुतनीकरण करून अद्ययावत असे नाट्यगृह उभारण्यात आले आहेत. या भागात सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत तरीदेखील चोरट्याने हात साफ केला.
नाशिक : चेटकिनीची भूमिका साकारणाऱ्या वैभव मांगले यांच्या अलबत्या-गलबत्या या गाजलेल्या बालनाटकाचा प्रयोग सुरू असताना नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या वाहनतळात उभ्या असलेल्या मांगले यांच्या टीमच्या बसमधून दोन बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपुर्वीच कालिदास कलामंदिराचे नुतनीकरण करून अद्ययावत असे नाट्यगृह उभारण्यात आले आहेत. या भागात सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत तरीदेखील चोरट्याने हात साफ केला. या चोरीच्या घटनेने कला क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिकला गुरूवारी अलबत्या गलबत्या हा धमाल उडविणारा नाटकाचा प्रयोग सुरू असताना अचानकपणे स्टेजजवळ वाहनतळात उभ्या असलेल्या बसमध्ये चोरटा शिरला आणि त्याने भर दुपारी दोन बॅगा पळवून नेल्या. चोरट्याचा हा प्रताप ‘तीसºया डोळ्यात’ कैद झाला असला तरी त्या डोळ्याच्या चित्रीकरणाची गुणवत्ता नसल्यामुळे पोलिसांना चोरट्याचा माग काढणे अवघड झाले असून चोरटा मोकाट आहे. या घटनेने पाहुण्या कलावंतांसह स्थानिक कलाक्षेत्रामध्येही नाराजी पसरली आहे.
नाटकाच्या प्रयोगात दंग असलेल्या वैभव मांगले यांच्या टीमला गुरूवारी आलेला हा अनुभव अत्यंत वाईट स्वरूपाचा तर आहेच; मात्र नाशिकमधील ‘स्मार्ट झालेल्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या सुरक्षेविषयीदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. अलबत्या गलबत्यामधील पडद्यामागील कलाकार वैभव शिंदे तसेच बसचालकाची बॅग चोरट्याने लांबविली. सुदैवाने या बॅगांमध्ये मोठी रक्कम नव्हती; मात्र पारपत्र (पासपोर्ट) मोबाईलसह अन्य महत्त्वाच्या वस्तू चोरीस गेल्या आहेत.
नाटकाचे निर्माते राहुल भंडारे यांनी याप्रकरणी तीव्र नाराजी दर्शविली असून महापालिका प्रशासन सुरक्षाव्यवस्थेबाबत चूक करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाकवी कालिदास कलामंदिराची वास्तू जरी उत्कृष्ट असली तरी येथील सुरक्षाव्यवस्था निकृष्ट असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.