हरिहर गडावर ट्रेकर्सचा धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:45 AM2017-11-05T00:45:34+5:302017-11-05T00:45:38+5:30
‘ट्रेकिंग’च्या नावाखाली मद्यप्राशनाची हौस भागविण्यासाठी गड-किल्ल्यांची निवड करणाºयांची वाढती संख्या निसर्गासाठी हानीकारक ठरत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक हरिहर गडावर अशाच एका मद्यपी ‘ट्रेकर्स’च्या टोळक्याने रानगवताला आग लावत धुडगूस घातल्याने संताप व्यक्त होत आहे.
नाशिक : ‘ट्रेकिंग’च्या नावाखाली मद्यप्राशनाची हौस भागविण्यासाठी गड-किल्ल्यांची निवड करणाºयांची वाढती संख्या निसर्गासाठी हानीकारक ठरत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक हरिहर गडावर अशाच एका मद्यपी ‘ट्रेकर्स’च्या टोळक्याने रानगवताला आग लावत धुडगूस घातल्याने संताप व्यक्त होत आहे. नाशिक शहरापासून अवघ्या ४० ते ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक अशा अवघड श्रेणीमधील हरिहर गडावर पौर्णिमेच्या प्रकाशोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या ‘ट्रेकर्स’च्या टोळक्याने हैदोस घातला. येथील गवत पेटवून देत मोठ्या आवाजाचे फटाके फोडून निसर्गाची हानी पोहचविण्याचा प्रयत्न केला. गवताला आग लागल्यानंतर गडावरील वृक्षसंपदेसह पशू-पक्ष्यांचे वास्तव्यही धोक्यात आले होते. येथील जैवविविधतेला हानी पोहचविणाºया ‘त्या’ अज्ञात टवाळखोरांविरुद्ध घोटी पोलीस व त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी निरगुडपाडा व हर्षेवाडी भागातील रहिवाशांनी केली आहे. फटाक्यांचा दणदणाट, पेटविलेल्या गवताने वाढलेली आग यामुळे येथील पक्षी-प्राणी सैरभैर झाले होते. हा प्रकार गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर काही आदिवासी बांधवांनी गडावर धाव घेतली. दरम्यान, मद्य व गांजाच्या नशेत धुंद असलेल्या टोळक्याने गावकºयांसोबत वाद घालत धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केल्याने गावकरी माघारी फिरले. टाके हर्ष गावात या टोळक्याने वाहने उभी करून हरिहर गडावर मुक्काम ठोकला होता.
वनविभागाकडून तक्रार
त्र्यंबक वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील हरिहर गडावरील लावलेल्या आगीची तीव्रता शनिवारी वनरक्षकांनी पाहणी करून तपासली; मात्र जंगल पेटलेले नव्हते तर शेकोट्यांमुळे काही प्रमाणात गवताची जाळपोळ झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वन व वन्यजिवांना धोका पोहचविण्याचा केलेला प्रयत्न आणि गावकºयांशी घातलेला वाद लक्षात घेऊन वनरक्षकाने अज्ञात ट्रेकर्सविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार पोलिसांकडून संबंधित गावकºयांकडून माहिती घेऊन त्यांचा शोध घेतला जाणार आहे. वनविभागाकडूनही वनसंवर्धन कायद्यान्वये कारवाई केली जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास आहिरे यांनी सांगितले.
‘ट्रेकिंग’च्या नावाखाली अशा प्रकारे गड-किल्ल्यांवर धुडगूस घालणे गैर आहे. यामुळे प्रामाणिक गिर्यारोहक अडचणीत सापडले आहेत. अशा टवाळखोर व मद्यपींवर वनविभागासह पोलिसांनी कारवाई करावी. गिरीभ्रमंती करताना केवळ आपल्या पाऊलखुणांव्यतिरिक्त गड-किल्ल्यांवर कुठलीही वस्तू गिर्यारोहक व दुर्गपर्यटकांनी ठेवणे अपेक्षित नाही. - अंबरिश मोरे, गिर्यारोहक