कचरामुक्त करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे त्र्यंबकेश्वर : प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांचे आवाहन
By admin | Published: February 7, 2015 01:46 AM2015-02-07T01:46:22+5:302015-02-07T01:46:47+5:30
कचरामुक्त करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे त्र्यंबकेश्वर : प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांचे आवाहन
त्र्यंबकेश्वर : ओला कचरा आणि सुका कचरा यांचे विघटन वेगवेगळ्या डब्यांमध्ये करून पालिकेच्या कचरा वाहतुकीच्या वाहनांमध्ये जमा करून पालिकेस सहकार्य करावे व प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांनी आज हरित फेरीच्या समारोपप्रसंगी केले.
गुरुवारी जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत केलेल्या सुचनेनुसार हरित फेरीचे आयोजन प्रांताधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार एन. बहिरम, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, नगराध्यक्ष अलका शिरसाट, उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, सर्व नगरसेवक, शिक्षक स्टाफ व दोन हजारावर विद्यार्थ्यांची भव्य रॅली प्रदूषणासंदर्भात व कचरा विघटनाच्या प्रबोधनासाठी काढण्यात आली होती.सर्व गावातून फेरी काढण्यात आल्यानंतर पालिका सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्याद्वारे प्रांताधिकारी बोलत होते.
शहरातील कचराडेपोत आता कचऱ्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने अशोका बिल्डकॉनच्या बायोगॅस प्रकल्पात ओल्या कचऱ्याचे रूपांतर बायोगॅसमध्ये करण्यासाठी नेण्यात येईल. सध्या पालिकेच्या डंपिंगमध्ये प्रक्रिया करून कचऱ्याचे मातीत रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तथापि आतापर्यंत ओल्या कचऱ्यामुळे प्रक्रिया स्लो पद्धतीने होत होती. सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया लवकर होत असते तो प्रश्न बायोगॅस प्रकल्पाने विनामूल्य सोपविला असल्याची माहिती वाघचौरे यांनी उपस्थितांना दिली. प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या प्रभागात फलक लावून जनतेला वर्गवारी करून सुका आणि ओला कचरा वेगळा करून ठेवावा, त्यासाठी महिलांना उद्युक्त करण्याचे आवाहन केले.
हॉटेलवालेदेखील स्वखर्चाने ड्रम आणणार असून, पालिकेस सहकार्य करण्याचे स्वतंत्र बैठकीत सांगितले. यावेळी नगरसेवक धनंजय तुंगार, तृप्ती धारणे यांनी मत व्यक्त केले.
बैठकीस ललित लोहगावकर, शकुंतला वाटागे, सिंधू मधे, अंजना कडलग, संतोष कदम, यशोदा अडसरे, अनघा फडके, धनंजय तुंगार, अभिजीत काण्णव, पुरुषोत्तम कडलग, पुरुषोत्तम लोहगावकर, रमेश कांगणे, दीपक बंगाल, ज्योतीताई माळी, नगरसेवक रवींद्र मधे आदि मान्यवर उपस्थित होते.
(वार्ताहर)