दोनशे जादा बसेस रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:30 AM2017-10-23T00:30:46+5:302017-10-23T00:30:52+5:30
सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी गेल्या मंगळवारपासून शनिवारी (दि.२१) मध्यरात्रीपर्यंत परिवहन महामंडळाच्या बसचालक-वाहकांनी पुकारलेला राज्यव्यापी संप सुरू होता. या चार दिवसांत नाशिक विभागाला ऐन दिवाळीत चार कोटींचा फटका बसला असून, हे नुकसान भरून काढण्याचे आव्हान विभागापुढे उभे ठाकले आहे. यासाठी दोनशे जादा बसेस रस्त्यावर धावत आहेत.
नाशिक : सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी गेल्या मंगळवारपासून शनिवारी (दि.२१) मध्यरात्रीपर्यंत परिवहन महामंडळाच्या बसचालक-वाहकांनी पुकारलेला राज्यव्यापी संप सुरू होता. या चार दिवसांत नाशिक विभागाला ऐन दिवाळीत चार कोटींचा फटका बसला असून, हे नुकसान भरून काढण्याचे आव्हान विभागापुढे उभे ठाकले आहे. यासाठी दोनशे जादा बसेस रस्त्यावर धावत आहेत. गेल्या मंगळवारपासून बसचालक-वाहक राज्यव्यापी संपावर गेल्यामुळे परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील सर्वच मार्गावरील बससेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे ‘लालपरी’ गेली कुठे? असाच प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात होता. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालक-वाहकांचा संप बेकायदेशीर असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. न्यायालयाने सर्व कर्मचाºयांना तत्काळ सेवेत रुजू होण्याचा आदेश दिला. तसेच सरकारला पाच सदस्यांची समिती स्थापन करण्याचे आदेशित केले. यानंतर परिवहन महामंडळाच्या राज्य कामगार संघटनेच्या वतीने राज्यव्यापी संप मागे घेण्यात आला. धनत्रयोदशी ते भाऊबीज असा दिवाळीचा हंगाम हा महामंडळासाठी एक पर्वणीकाळ असतो. या कालावधीत नाशिक विभागाला दिवसाला एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते; मात्र या चारही दिवस संपामुळे गाजल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर पाणी फिरले आहे.
...अखेर ‘लालपरी’ हसली
न्यायालयाचा आदेश प्राप्त होताच राज्यव्यापी संप मागे घेण्यात आला आणि चार दिवसांपासून रुसलेली ‘लालपरी’ अखेर हसली, अशाच काहीशा प्रतिक्रिया प्रवाशांनी बोलून दाखविल्या. चार दिवसांपासून एसटीची चाके रुतली होती. परिवहन महामंडळाच्या कारभाराविरुद्ध सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. संप मिटल्यानंतर परिवहन विभागासह महामंडळाने आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
शहर बससेवाही पूर्ववत
चार दिवसांपासून नाशिककरांची शहर बस अदृश्य झाली होती. शहर बससेवेचे जंक्शन म्हणून ओळखले जाणारे निमाणी बसस्थानक ओस पडल्याचे चित्र होते. संप मिटल्यानंतर शहर बससेवा पूर्ववत झाली आणि पुन्हा बसस्थानक गजबजले. नाशिकरोड बसस्थानकासह शहरातील सर्व मार्गांवर शहर बसेसचे दर्शन घडू लागल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला. शहर बसेसच्या सर्व नियोजित फेºया विविध मार्गांवर सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.