वन्यजीव सप्ताहाच्या प्रारंभी रोखली मगर-कासवांची तस्करी; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 05:07 PM2018-10-01T17:07:11+5:302018-10-01T17:26:11+5:30
यावेळी त्यांच्या संवादावरून साध्या वेशात त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या पोलिसांचा संशय बळावला. यावेळी संशयित फैज गयासुद्दीन कोकणी (२०, रा. कोकणीपुरा), सौरभ रमेश गोलाईत (२०, रा. जेलरोड) हे दोघे हॉटेलमधून बाहेर पडले. यावेळी कोकणी याच्या हातात खोका असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
नाशिक : मगरीच्या आठ पिल्लांसह गोड्या पाण्यातील दुर्मीळ कासवांच्या (ब्लॅक पॉण्ड टर्टल) तस्करीचा सौदा गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने जागतिक वन्यजीव सप्ताहच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि.१) उधळला. जुन्या नाशकातील कोकणीपुरा भागात या दुर्मीळ वन्यजिवांची बोली लावली जात असल्याची माहिती आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. याप्रकरणी दोघा संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांचे पथक मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तीन दिवसांपासून मागावर होते; मात्र संशयितांना रंगेहाथ पकडण्यास त्यांना यश मिळत नव्हते; अखेर मगरीची पिल्ले व कासवांचा सौदा करण्यासाठी जुन्या नाशकातील सारडा सर्कल, कोकणीपुरा भागात सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोन युवक एका हॉटेलमध्ये एकमेकांना भेटले. यावेळी त्यांच्या संवादावरून साध्या वेशात त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या पोलिसांचा संशय बळावला. यावेळी संशयित फैज गयासुद्दीन कोकणी (२०, रा. कोकणीपुरा), सौरभ रमेश गोलाईत (२०, रा. जेलरोड) हे दोघे हॉटेलमधून बाहेर पडले. यावेळी कोकणी याच्या हातात खोका असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. बर्डेकर व त्यांच्या पथकाने त्यांना तत्काळ ताब्यात घेत वाहनात डांबले. ‘खाकी’चा हिसका दाखविल्यानंतर संशयितांनी कबुली दिली. या खोक्यात मगरीची दोन पिल्ले पोलिसांना आढळून आली. संशयितांच्या माहितीवरून पोलिसांनी तत्काळ जेलरोड गाठून गोलाईत याच्या आलिशान बंगल्यावर धाड टाकली. गोलाईत याने बंगल्यात दडवून ठेवलेली मगरीची उर्वरित सहा पिल्ले व दोन कासव पोलिसांच्या हवाली केले. अवैधरीत्या चोरट्या मार्गाने तस्करीसाठी नैसर्गिक अधिवासातून आणलेल्या या वन्यजिवांची संशयितांनी लाखोंच्या घरात बोली लावली होती. गुन्हे शाखेच्या वतीने वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार या दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वनविभाग पश्चिम नाशिक व गुन्हे शाखा संयुक्तरीत्या करत आहेत.