एस.टी.कडून पुन्हा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:30 AM2017-11-27T00:30:19+5:302017-11-27T00:32:10+5:30
नाशिक : शहर बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याची भूमिका घेत राज्य परिवहन महामंडळाने महापालिकेला शहरातील बससेवा ताब्यात घेण्यासाठी मागील तीन वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू केला आहे. मात्र पालिकेने प्रत्यक्षात पाऊल उचललेले नसल्याने राज्य परिवहन महामंडळाने आता पुन्हा पालिकेला अल्टिमेटम दिला असून, येत्या महिनाभरात शहरातील बससेवा ताब्यात घेण्यासाठी पत्र पाठवले आहे. महामंडळाच्या या पत्रावरून नवीन वर्षापासून एस.टी. महामंडळ शहर बससेवा थांबविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहर बससेवा चालविणे ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेची जबाबदारी असल्याने पालिकेने प्रवासी वाहतूक सेवा ताब्यात घ्यावी, यासाठी एस.टी. महामंडळाने वारंवार पत्रव्यवहार केला आहे. महामंडळाने अनेकदा निर्वाणीची भाषा वापरून कोणत्याही क्षणी शहर बससेवा बंद करण्याचीदेखील भूमिका घेतली होती. शहरातील जवळपास १३० बसफेºया बंददेखील करण्यात आलेल्या आहेत. मात्र अजूनही पालिकेकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. शहरानजीकच्या ग्रामीण भागातील बसेस बंद केल्यानंतर स्थानिक गावकरी आणि विद्यार्थ्यांनी बससेवा बंद करू नये, यासाठी महामंडळाला साकडे घातल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता महामंडळाने तूर्तास सर्व बसेस बंद न करण्याची भूमिका घेत लांबपल्ल्याच्या गाड्यांना महामार्गावरील गावांचे थांबे देण्यात येऊन तात्पुरता पर्याय काढण्यात आला आहे. सुरुवातीच्या विरोधानंतर महापालिकेने आता काही प्रमाणात अनुकूलता दर्शविली असून, यासंदर्भात एक समिती गठित करून खासगी संस्थांच्या माध्यमातून बससेवा चालविण्याच्या पर्यायाबाबत विचार केला जाईल, असे जाहीर केलेले आहे. मात्र पालिकेची एकूणच मानसिकता आणि होणारा विलंब लक्षात घेता महामंडळाने पालिकेला त्वरित निर्णय घेण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. महामंडळाला आता बस चालविणे शक्य नसल्याने आणि राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांची बससेवा सुरू केल्यामुळे नाशिक महापालिकेने देखील दोन महिन्यांत याबाबत निर्णय घ्यावा, असे पालिकेला कळविले आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत शहरातील प्रवासी कोणत्या सार्वजनिक वाहनाने प्रवास करतील, याचा फैसला होणार आहे.
विद्यार्थ्यांना दिलासा
शहरापासून जवळच म्हणजे महापालिका हद्दीच्या सीमारेषांवरील गावांमधील बससेवा महामंडळाने बंद केली होती. सुमारे दीडशेपेक्षा जादा बसेस बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाºया नागरिकांचे आणि विशेषत: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागल्याने महामंहळाकडे तक्रारी वाढल्या होत्या. लोकप्रतिनिधींनीदेखील तूर्तास बसेस बंद न करण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महामंडळाने मुंगसरा, सिद्धपिंप्री, मखमलाबाद, सायखेडा, शिवडा, लाखलगाव, भगूर, गिरणारे येथील बंद केलेल्या बसेसच्या फेºया पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.