भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाकडून खातेदारांसाठी ‘उमंग’ अॅप्लिकेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:48 PM2017-11-06T23:48:47+5:302017-11-07T00:21:09+5:30
भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाची दिवसेंदिवस पारदर्शक कारभाराकडे वाटचाल सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून पी.एफ. खातेदारांसाठी ‘उमंग’ नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून खातेदार घरबसल्या आपले व्यवहार करू शकतील, अशी माहिती भविष्यनिर्वाह निधी आयुक्त एम. एम. अशरफ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
सातपूर : भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाची दिवसेंदिवस पारदर्शक कारभाराकडे वाटचाल सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून पी.एफ. खातेदारांसाठी ‘उमंग’ नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून खातेदार घरबसल्या आपले व्यवहार करू शकतील, अशी माहिती भविष्यनिर्वाह निधी आयुक्त एम. एम. अशरफ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पूर्वी पी.एफ. खातेदारांना आपल्या खात्यावरील रक्कम पाहण्यासाठी अथवा निधी काढण्यासाठी वारंवार भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात तासन्तास ताटकळत थांबावे लागत होते. गर्दीमुळे खातेदारांना सेवा देण्यास कर्मचाºयांना अडचण निर्माण होत होती. त्यात नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांतील खातेदारांची परवड होत होती. भविष्यनिर्वाह निधी विभागाने बदल करीत पारदर्शक कारभारावर जोर दिला आहे. काही दिवसांपूर्वी खातेदारांसाठी एक पोर्टल तयार करण्यात आले होते. आता ‘उमंग’ नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या अॅप्लिकेशनमुळे खातेदारांना आपल्या मोबाइलवर खात्यातील शिल्लक रक्कम, एकूण जमा रक्कम आदी बाबी नियमित पाहता येतील. शिवाय खात्यातून काही रक्कम काढायची सोयदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता राहणार नाही. या अॅप्लिकेशनमुळे खातेदारांची गैरसोय होणार नाही, असा दावा या कार्यालयाने केला आहे.
आजकाल सर्वांकडे अँड्रॉइड मोबाइल फोन असल्याने प्ले स्टोअरमधून ‘उमंग’ नावाचे अॅप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावे लागेल. तत्पूर्वी केवायसी करणे आवश्यक आहे. त्यात जन्मदिनांक, लिंग आणि नाव आवश्यक आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पी.एफ. खातेदार आपले सर्व व्यवहार घरबसल्या करू शकतो. काही अडचणी आल्यास (उदा. नाव बदल, जन्मदिनांक) पी. एफ. कार्यालयात अर्ज करून योग्य त्या दुरु स्त्या करण्यास सहकार्य केले जाईल.