सापळा रचून दोघा संशयितांच्या गावठी पिस्तुलासह शिताफीने आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 06:21 PM2017-09-28T18:21:09+5:302017-09-28T18:21:19+5:30
गावठी पिस्तुलासह आल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला मिळाली. यानुसार पोलिसांनी सकाळी सापळा रचून दोघा संशयितांच्या गावठी पिस्तुलासह शिताफीने मुसक्या आवळल्या.
नाशिक : येथील म्हसरूळ परिसरात विक्रीच्या इराद्याने दोघे तरुण गावठी पिस्तुलासह आल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला मिळाली. यानुसार पोलिसांनी सकाळी सापळा रचून दोघा संशयितांच्या गावठी पिस्तुलासह शिताफीने मुसक्या आवळल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस शिपाई गणेश वडजे यांना या संशयितांबाबतची गुप्त माहिती मिळाली होती. वडजे यांनी पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांना सदर बाब सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून सापळा लावला. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित दौलत नामदेव गोºहे (२० माळेगाव, ता. त्र्यंबकेश्वर) सिद्धेश मनोज जोंधळे (२५,रा.टाकळी) यांच्या संशयास्पद हालचाली बघून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, लोखंडी शस्त्र, विनाक्रमांकाची यामाहा एफ.झेड दुचाकी असा एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत वडजे यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख करीत आहे.