‘एक गाव, एक गणपती उत्सवासाठी प्रयत्न’
By admin | Published: September 8, 2015 11:08 PM2015-09-08T23:08:02+5:302015-09-08T23:08:36+5:30
‘एक गाव, एक गणपती उत्सवासाठी प्रयत्न’
निफाड : राज्यात दुष्काळाचे सावट आहे, पाऊस न पडल्याने शेतकरी, मजूरवर्ग कोलमडून पडला आहे. अशा परिस्थितीत आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी व सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निफाड शहरात ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवावी, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी सरपंच भारती कापसे यांनी केले आहे.
निफाड शहर व परिसरात यंदा समाधानकारक पाऊसच झाला नाही, याचा परिणाम शेतीसह इतर उद्योगव्यवसायांवर झाला आहे. मजूर, व्यापारीवर्गालाही आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शहरात पैशांची उधळपट्टी करून गल्लोगल्ली सार्वजनिक गणपती बसवले तर ते योग्य ठरणार नाही. निफाडमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून बऱ्याचदा सक्तीने वर्गणी वसूल केली जात असल्याने व्यापारी वर्ग, सर्वसामान्य जनतेत नाराजी असते. आधीच दुष्काळ त्यात महागाई त्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. गणेशोत्सव मंडळातर्फे विद्युत रोषणाई, डेकोरेशन, मिरवणुकीसाठी महागडे बॅण्ड, डीजे यासाठी वारेमाप खर्च केला जातो.
अशा दुष्काळी परिस्थितीत गणेशोत्सवाच्या नावाखाली सक्तीची वर्गणी वसुली करून गणेशोत्सव साजरा न करता ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवावी, अशी सूचना कापसे यांनी केली आहे. गणेशोत्सव सर्वानुमते, सर्वांच्या सहभाग व सहकार्याने सामाजिक उपक्रम राबवून साजरा करावा, असे यांनी सांगितले.त्यासाठी निफाड शहरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक व मंडळाचे कार्यकर्ते, प्रशासकीय व पोलीस अधिकारी यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवावा व निफाड शहराचा आदर्श सर्वांसमोर ठेवावा, असे आवाहन कापसे यांनी केले आहे. (वार्ताहर)
सिन्नरला शिवाजी चौकात दहीहंडी उत्साहात
सिन्नर : येथे शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. दहीहंडी फोडण्यासाठी गोंदेश्वर मित्रमंडळ, नागेश्वर मित्रमंडळ, बजरंग मित्रमंडळाच्या गोविंदांनी हजेरी लावली. पाच थर लावून बजरंग मित्रमंडळाच्या गोविंदांनी दहीहंडी फोडली. त्यांना आयोजकांच्या वतीने रोख पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक संजय नवसे, गौरव कर्पे, योगेश शेजवळ, विकी जाधव, आशिष नवसे, भय्या पेखळे, बापू वैद्य, तुषार क्षत्रिय, अजित गिते, संकल्प जाखडी, संदीप भालेराव आदिंसह तरुण उपस्थित होते. घनश्याम देशमुख, मनीष गुजराथी, हेमंत देवनपल्ली यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)