शहरापेक्षा ग्रामीण भागात दिसला मतदारांचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 01:20 AM2019-10-22T01:20:34+5:302019-10-22T01:21:24+5:30
Maharashtra Assembly Election 2019सकाळी संथ सुरूवात झालेल्या देवळाली मतदारसंघातील मतदानाला दुपारनंतर काहीशी गती आाणि नेहमीप्रमाणे सायंकाळी अनेक केेंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाची अंमित आकडेवारी हाती आली तेंव्हा ५६.०५ टक्के इतके मतदान झाले.
नाशिकरोड : सकाळी संथ सुरूवात झालेल्या देवळाली मतदारसंघातील मतदानाला दुपारनंतर काहीशी गती आाणि नेहमीप्रमाणे सायंकाळी अनेक केेंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाची अंमित आकडेवारी हाती आली तेंव्हा ५६.०५ टक्के इतके मतदान झाले. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सर्वच पक्षांकडून धावपळ सुरू होती. सायंकाळच्या सुमारास याचा परिणाम दिसून आला. चोख बंदोबस्त असल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व तयारीनिशी सकाळीच दाखल झाले होते. मतदानप्रक्रिया सुरू झाल्यानंतर सकाळी ८ वाजेपासून काही मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झाली होती, तर ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी आपला हक्क बजावून शेतीवर निघूनही गेले होते.
देवळालीगाव सोमवारपेठ मनपा शाळा, तेलीगल्ली मनपा शाळा, विहितगाव मनपा शाळा, वडनेर मनपा शाळा, पिंपळगाव खांब, दाढेगाव, चेहेडी पंपिंग आदर्श विद्यामंदिर, सिन्नरफाटा मनपा शाळा, चेहेडी, गोरेवाडी मनपा शाळा, शिंदे, पळसे, एकलहरा, चाडेगाव, सामनगाव, देवळाली कॅम्प, भगूर, बेलतगव्हाण, संसरी, नाणेगाव, लहवित आदी ग्रामीण भागात सकाळी मतदारांची गर्दी झाली होती. दुपारनंतर पुन्हा मतदारांची गर्दी झाली होती. सर्वच मतदान केंद्राबाहेर प्रमुख राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती तर अन्य पक्ष आणि अपक्षांचे काही मोजक्या ठिकाणी बुथ लागले होते. मतदान केंद्राबाहेर मतदारांना नाव मतदार नावाच्या चिठ्ठ्या देण्यासाठी शासकीय बुथदेखील लावण्यात आले होते. देवळाली व नाशिकरोड भागात काही ठिकाणी एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर आल्याने मतदारांना नाव शोधून जाण्यासाठी त्रास सहन करावा लागला. मतदारांना आणण्यासाठी व सोडण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये रिक्षा व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅनची संख्या अधिक होती.
सायंकाळी ६ वाजताच सर्व मतदान केंद्राबाहेरील प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. सर्व मतदान यंत्र, साहित्य, कर्मचारी यांना बसेसमधून पोलीस बंदोबस्तात दुर्गा उद्यान येथील मनपाच्या विभागीय कार्यालयात नेण्यात आले. सायंकाळी ७ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत देवळालीगाव सत्कार पॉर्इंट ते मुक्तिधाम छायानिवासपर्यंत बॅरिकेट््स टाकून दुतर्फा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
कडेकोट सुरक्षा
देवळालीगावातील दोन्ही मतदान केंद्रावर दुपारी चारनंतर अचानक मतदारांची गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळाले दरम्यान सर्व मतदान केंद्राच्या दोन्ही बाजुला १०० मीटर अंतरावर बॅरिकेटस् टाकुन रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सर्वत्र अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तर गैरप्रकार, आर्थिक प्रलोभन, अनुचित घटना रोखण्यासाठी पोलिसांची गस्त देखील वाढविण्यात आली होती.