विंगेतील कलावंतांनीही जगवली मराठी रंगभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:32 AM2017-11-05T00:32:00+5:302017-11-05T00:32:04+5:30
रंगभूमी ही के वळ लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांपुरतीच मर्यादित नसून नाट्यप्रयोग यशस्वी होण्यासाठी बॅकस्टेज अर्थात विंगेतील कलावंतांचीदेखील तेवढीच महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ध्वनीव्यवस्था, प्रकाशयोजना, नेपथ्य, रंगभूषा यांसह लेखन, दिग्दर्शन आणि कलावंतांचा अभिनय जुळून आला तर श्रोते तो नाट्यप्रयोग अक्षरश: डोक्यावर घेतात. सांघिक प्रयत्नांच्या या खेळात आणि रंगभूमी जगवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा पडद्यामागील कलावंत मात्र नेहमीच उपेक्षित राहत आला आहे.
स्वप्निल जोशी ।
नाशिक : रंगभूमी ही के वळ लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांपुरतीच मर्यादित नसून नाट्यप्रयोग यशस्वी होण्यासाठी बॅकस्टेज अर्थात विंगेतील कलावंतांचीदेखील तेवढीच महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ध्वनीव्यवस्था, प्रकाशयोजना, नेपथ्य, रंगभूषा यांसह लेखन, दिग्दर्शन आणि कलावंतांचा अभिनय जुळून आला तर श्रोते तो नाट्यप्रयोग अक्षरश: डोक्यावर घेतात. सांघिक प्रयत्नांच्या या खेळात आणि रंगभूमी जगवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा पडद्यामागील कलावंत मात्र नेहमीच उपेक्षित राहत आला आहे. रंगभूमीला अनेक वर्षांची परंपरा लाभली असली तरीही बदलत्या काळानुसार त्यात अनेक बदल होत गेले. ज्याप्रमाणे तंत्रज्ञान बदलत गेले त्याप्रमाणे लावंतांमध्येही बदल घडत गेले. हेच बदल रंगमंचावरही दिसू लागले. या बदलांचे स्वागत होत असले तरीही जुन्या तंत्रज्ञानाला रंगभूमीवर तेवढेच महत्त्व आहे. अनेक नाट्यगृहांमध्ये नवीन तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने जुन्याच तंत्रज्ञानानुसार काम करावे लागते. या क्षेत्रात येणाºया नवीन पिढीने मात्र नव्या तंत्रज्ञानाबरोबरच जुन्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. रंगभूमीचे यश हे सामूहिक यश असून, या सामूहिक यशात ध्वनीव्यवस्था, प्रकाश योजनाकार, नेपथ्यकार, रंगभूषाकार यांचाही तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे. एरवी ही ‘बॅकस्टेज’ला असलेली मंडळी प्रकाशझोतात येत नसल्याने आजच्या ‘मराठी रंगभूमी दिनी’ त्यांच्याशी साधलेला संवाद आणि यातून उलगडत गेलेला रंगमंचाच्या स्थित्यंतराचा हा प्रवास बºयाच गोष्टी सांगून जातो.
शेती सांभाळून रंगभूषा साकारायची असल्याने सुरुवातीला हौशी कलावंतांसाठीच काम करण्याचे ठरवले. ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांच्यासोबत काही काळ घालवल्याने या क्षेत्राबद्दल आवड निर्माण झाली. त्यावेळी रंगभूमीवर काम करणारे नेताजी भोईर, सतीश सामंत, नारायण देशपांडे ही फळी थांबल्याने नाशिकची रंगभूमी काही काळ विसावली. याच काळात सतीश सामंत यांनी बारकावे काढून मार्गदर्शन केले. सुरुवातीला कामात सुबकता नव्हती, चांगली फिनिशिंग जमत नसल्याने यानंतर काही काळ फक्त फिनिशिंगवरच लक्ष केंद्रित केले. आता दिग्दर्शक थेट काम थोपवू लागल्याने रंगभूमीचा विश्वास संपादन केल्यासारखे वाटते. पूर्वी नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. नाटक आणि तमाशाला एकाच तराजूत मोजले जायचे, परंतु याकडे दुर्लक्ष करत रंगभूमीसाठी माझे योगदान देतच राहिलो. या क्षेत्रात येणाºया नव्या पिढीकडे संघर्ष करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. - माणिक कानडे, रंगभूषाकार
आज रंगभूमीवर येणाºया प्रत्येकाला त्या नाटकातील मुख्य भूमिका हवी आहे, त्या तुलनेने तंत्रज्ञानाकडे जाणारी पिढी मात्र घडताना दिसत नाही. पूर्वी सादर होणाºया अभिनयांमध्ये दम असायचा पण आता ‘कॉलर माईक’मुळे कलाकारांचे भावनिक आवभाव गायबच झाले आहेत. दूरचित्रवाणीवर प्रसारित होणाºया डेलिसोपमुळे आताच्या रंगभूमीचा प्रेक्षकदेखील बदलला आहे. सुरुवातीला आॅर्केस्ट्रातून साथसंगतीचे काम करायला सुरुवात केल्यानंतर रंगभूमीवर आलो. एकदा मित्राच्या कार्यक्रमात साउंड आॅपरेटर आलेला नव्हता तेव्हा ही भूमिका मी निभावली आणि तेव्हापासून स्वत:ला या कामात वाहून घेतले. साउंड सिस्टम म्हणजे काय हे अनेकांना माहीत नव्हते, परंतु आता याबाबत सगळ्यांना माहिती आहे. या क्षेत्राकडे आता आदरयुक्त भावनेने बघितले जाते. या क्षेत्रात बराच काळ संघर्ष करावा लागत असला तरीही संघर्षामुळेच यश मिळते आणि कलेच्या क्षेत्रात कुणीच परिपूर्ण नसते. - पराग जोशी, ध्वनीव्यवस्था
शाळेत असतानाच बालनाट्य करता करता या क्षेत्राबद्दल आपोआप आवड निर्माण होत गेली. बालनाट्याच्या प्रयोगादरम्यान शिक्षकांनी रंगमंचावर खुर्च्या कशा लावाव्यात, टेबल कसे ठेवावेत यासारख्या बारीकसारीक गोष्टी शिकवल्या. चित्रकलेचे शिक्षक त्याकाळी सेट बनवत असत. त्याकाळी वापरण्यात येणाºया ग्लॉझच्या पडद्यांमुळे रंगमंच अधिकच खुलून दिसत असे त्यामुळे नेपथ्य आणि प्रकाश योजनेबद्दल अधिक आवड निर्माण होत गेली. तंत्रज्ञानाचा विचार करता आज सगळे काही उपलब्ध आहे. पूर्वी पडदे कापडाच्या सहाय्याने खळ लावून रंगवले जात, पण आता हे आता रेडिमेड उपलब्ध आहे. हल्ली हे सगळे बॅनरमुळे सहज शक्य असले तरीही यामुळे रंगमंच अधिक भंपक वाटतो, त्यात जिवंतपणा येत नाही. - ईश्वर जगताप, नेपथ्यकार