केंद्र सरकारमधील १० लाख पदे भरणार; राहुल गांधी यांचे तरुणांना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 06:29 AM2024-03-05T06:29:48+5:302024-03-05T06:30:44+5:30
भाजपने सातत्याने कंत्राटी पद्धतीला चालना दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
नवी दिल्ली : इंडिया आघाडी युवकांसाठी नोकऱ्यांचे बंद दरवाजे उघडेल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी येथे म्हटले. भाजपने सातत्याने कंत्राटी पद्धतीला चालना दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
१५ प्रमुख विभागांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक पदे का रिक्त आहेत, याचे उत्तर केंद्र सरकारकडे आहे का? कायमस्वरूपी नोकऱ्या देणे हे ओझे समजणारे केंद्र सरकार सातत्याने कंत्राटी पद्धतीला प्रोत्साहन देत आहे, जिथे ना सुरक्षा आहे, ना सन्मान. या रिक्त पदांवर देशातील तरुणांचा हक्क आहे आणि ही पदे भरण्यासाठी आम्ही एक ठोस योजना तयार केली आहे. तरुणांसाठी नोकऱ्यांचे बंद दरवाजे उघडण्याचा इंडिया आघाडीचा संकल्प आहे, असेही ते म्हणाले.
सरकार शेतकऱ्यांना शत्रूसारखे वागवत आहे : खरगे
केंद्र सरकार त्यांच्या हक्कांची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांशी ‘शत्रूसारखे वागत’ आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी केला. एमएसपी देण्याची सरकारची ‘हमी’ खोटी ठरली आहे, असा दावाही त्यांनी केला.
बेरोजगारी आणि महागाई हे मुख्य मुद्दे सोडून माध्यमांनी चीन, पाक, क्रिकेट, बॉलिवूडकडे लोकांचे लक्ष वळविले आहे.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते
केंद्रात रिक्त पदे -
७८ विभागांत ९ लाख ६४ हजार पदे रिक्त
रेल्वे - २.९३ लाख
गृह मंत्रालय - १.४३ लाख
संरक्षण मंत्रालय - २.६४ लाख
- ४४.४९%बेरोजगार २० ते २४ वर्षे वयातील तरुण
- ४५ वर्षांतील हा सर्वाधिक बेरोजगारीचा दर
- ३ पैकी एक पदवीधर बेरोजगार
- २ बेरोजगारांची प्रत्येक तासाला आत्महत्या.
- १५,७८३ बेरोजगारांनी आत्महत्या केली.