114 पाकिस्तानी लोकांना मिळालं भारतीय नागरिकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:51 PM2017-07-21T13:51:27+5:302017-07-21T13:56:33+5:30
पाकिस्तानातल्या 114 लोकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलं आहे.
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 21 - पाकिस्तानातल्या 114 लोकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. नंदलाल मेघानी, डॉ. विशनदास मनकानी आणि किशनलाल अडानी यांचाही भारतीय नागरिकत्व मिळालेल्या व्यक्तींमध्ये समावेश आहे. या पाकिस्तानी नागरिकांना आज भारताच्या नागरिकत्वाचं प्रमाणपत्र बहाल करण्यात येणार आहे.
अहमदाबादचे 50 वर्षीय नंदलाल मेघानी 16 वर्षांपूर्वीच पाकिस्तानातील सिंध प्रांतातून पत्नी आणि मुलीसह भारतात आले. भारतात नवी सुरुवात करण्यासाठी त्यांनी तिथलं घर आणि व्यवसाय विकून टाकला. आम्ही भारतात सामान्य नागरिक जगत असलेल्या राहणीमानामुळे प्रभावित झालो होतो. त्यामुळेच आम्हाला भारतीय नागरिकत्व मिळावं, यासाठी सरकारकडे अर्ज केला होता, असंही नंदलाल मेघानी यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानातील वाढत्या गुन्हेगारीमुळे आम्हाला भारतात शरण यावं लागलं. पाकिस्तानात वाढत चाललेल्या दहशतवाद्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या मुस्लिम मित्रांनी मला भारतात स्थायिक होण्याची सूचना केली होती. मेघानी हे पाकिस्तानमध्ये ऑटो पार्ट्सचा व्यवसाय करत होते.
तर पाकिस्तानमधून आलेले 59 वर्षीय किशनलाल अडानी म्हणाले, मी 2005मध्ये पत्नी आणि 4 मुलांसह भारतात आलो. अडानी हे सिंध प्रांतातील एक दुकान चालवत होते. भारतात आल्यावर मुलांना हाताशी घेऊन त्यांनी भांड्यांचं दुकान सुरू केलं. मला आतासुद्धा त्या घराची आणि मित्रांची आठवण येते. मात्र पाकिस्तानात वाढत असलेल्या दहशतवादामुळे तिथं आमचं वाचणं जवळपास मुश्कील होतं. ज्यावेळी आम्ही बाहेर पडत होते, तेव्हा परत घरी येऊ की नाही, हाच प्रश्न सतावत असे, असंही अडानी म्हणालेत. पाकिस्तानपेक्षा भारत हा सुरक्षित आणि विकसित देश आहे, असं डॉ. विशनदास मनकानी यांनी सांगितलं आहे. विशनदास मनकानी हे 2001 रोजी स्वतःच्या 4 मुलांसह भारतात आले. मला आणि माझ्या पत्नीला 2016 रोजी भारतीय नागरिकत्व मिळालं. आम्ही भारताचा विकास पाहून अचंबित झालो आहोत. पाकिस्तानात असा विकास कुठेच दिसत नाही. भारतातील सुरक्षित वातावरण आम्हाला भारतात घेऊन आलं आहे, असंही मनकानी यांनी सांगितलं.
आणखी वाचा
"पाकिस्तानला धडा शिकवणार", शहिदाच्या मुलीचा निर्धार
"तो" चहावाला पाकिस्तानी नाही; जियो न्यूजचा दावा
उस्मानाबादमध्ये चीन, पाकिस्तानच्या ध्वजाची होळी
दीर्घ काळापासून व्हिसाच्या आधारे भारतात वास्तव्याला असलेल्या किमान 114 पाकिस्तानी लोकांना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्याची सुविधा केंद्रीय गृह मंत्रालय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी करून दिली होती. त्यामुळे शंभरावर पाकिस्तानी लोकांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला असून, अनेकांनी भारतात वास्तव्यासाठी दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केले आहेत. भारताचे नागरिकत्व मिळविण्यासंबंधी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्यांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे जोधपूरचे जिल्हाधिकारी विष्णू चरण मलिक यांनी सांगितले होते. गेल्या वर्षी मार्चपर्यंत 1702 अर्ज आले असून, प्रशासनाने त्यापैकी 168 जणांना भारतीय नागरिकत्व देण्याची शिफारस केली होती. उर्वरित अर्जांमध्ये चुका असल्यामुळे त्यासंबंधी प्रक्रिया पुढे नेता येणार नाही. अनेक अर्जदार शहानिशेच्या वेळी उपस्थित झाले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.