काश्मीरमध्ये तिरंगा यात्रेसाठी निघालेल्या 200 भाजपाच्या कार्यकर्त्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 04:07 PM2017-08-15T16:07:10+5:302017-08-15T16:11:04+5:30
स्वातंत्र्यदिनानिमित्त काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यासाठी तिरंगा यात्रेत सामील झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
श्रीनगर, दि. 15 - स्वातंत्र्यदिनानिमित्त काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यासाठी तिरंगा यात्रेत सामील झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यातील तणावाची परिस्थिती पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. भाजपाच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्याक्ष अैजाझ हुसैन यांच्यासह काही कार्यकर्त्यांना सोमवारी रात्री अटक केली. तर अबी गुलजार यांच्यासह काही जणांना आज सकाळी ताब्यात घेतले असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 200 भाजपाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचे समजते. याचबरोबर येथील मोबाईल इंटरनेट सेवा प्रशासनाकडून स्थगित करण्यात आली आहे.
All workers were detained in different police stations to maintain law and order on Independence Day.
— ANI (@ANI) August 15, 2017
स्वातंत्र्यदिनानिमित्त काश्मीरमध्ये आज भाजपाच्यावतीने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. उद्यापासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. यामध्ये विविध गटांचे नेते प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचणार आहेत. भाजपाचे प्रत्येक खासदार आपल्या मतदार संघात ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ चा जयघोषही करणार आहेत.
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, भाजपाच्या कार्यकर्त्यांना अटक करणे, हे सरकारचा नियोजित प्लॅन होता, असे म्हटले आहे.