"22 लोकांकडे देशातील 70 कोटी लोकांइतकी संपत्ती", राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 06:24 PM2024-04-13T18:24:33+5:302024-04-13T18:25:21+5:30
Lok Sabha Election 2024 : छत्तीसगडमधील बस्तरमध्ये आयोजित प्रचार सभेला राहुल गांधी यांनी संबोधित केले.
बस्तर : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपासह काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी छत्तीसगडचा दौरा केला. यावेळी देशातील 22 लोकांकडे देशातील 70 कोटी लोकांइतकी संपत्ती आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, असे राहुल गांधी म्हणाले. छत्तीसगडमधील बस्तरमध्ये आयोजित प्रचार सभेला राहुल गांधी यांनी संबोधित केले.
या सभेदरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी 24 तास फक्त त्या 22 लोकांसाठी मदत करत असतात. तसेच, बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे, भागिदारी कमी होत आहे. प्रत्येक राज्यातील लोक तुम्हाला सांगतील की मुख्य मुद्दा बेरोजगारी आणि महागाईचा आहे.
याचबरोबर, यावेळी उपस्थित लोकांना राहुल गांधी यांनी विचारले की, तुम्ही कधी माध्यमांनी बेरोजगारी, महागाईवर बोलताना पाहिले आहे का? माध्यमे तुम्हाला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना समुद्राच्या तळाशी जाताना किंवा मंदिरात प्रार्थना करताना दाखवतील. प्रसारमाध्यमांना बेरोजगारी आणि महागाईशी काहीही देणेघेणे नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
#WATCH | Chhattisgarh: At a public meeting in Bastar, Congress leader Rahul Gandhi says, "We want to change your lives, we want to help you. If Narendra Modi can give money to millionaires, Congress can give that money to the poor. And so we are bringing a new policy,… pic.twitter.com/HAqsyr8B4P
— ANI (@ANI) April 13, 2024
"प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा 8500 रुपये देणार"
आम्हाला तुमचे जीवन बदलायचे आहे, आम्हाला तुमची मदत करायची आहे. नरेंद्र मोदी उद्योजकांना पैसे देऊ शकतात तर काँग्रेस गरीबांना पैसे देऊ शकते. त्यामुळे आम्ही 'महालक्ष्मी' हे नवीन धोरण आणत आहोत. निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच अंमलबजावणी केली जाईल. दारिद्र्यरेषेखालील (BPL) आम्ही प्रत्येक कुटुंबातील एका महिलेची निवड करू आणि आमचे सरकार प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा 8500 रुपये देईल. तसेच आम्ही एका वर्षात महिलांना एकूण एक लाख रुपये देणार आहोत, असेही राहुल गांधी यांनी जनसभेला संबोधित करताना सांगितले.