बिहार पूरग्रस्तांसाठी ५00 कोटींची मदत जाहीर, नरेंद्र मोदींनी नितीश कुमारांसह केली पूरस्थितीची हवाई पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 05:28 AM2017-08-27T05:28:28+5:302017-08-27T05:28:28+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारातील पूरस्थितीची शनिवारी हवाई पाहणी केली, तसेच पूरग्रस्त भागाला ५00 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली.
एस. पी. सिन्हा।
पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारातील पूरस्थितीची शनिवारी हवाई पाहणी केली, तसेच पूरग्रस्त भागाला ५00 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. पुरात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांसाठी २ लाख रुपयांचे, तर गंभीर जखमींना ५0 हजारांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणाही त्यांनी केली.
पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक बिहारला पाठविण्यात येईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेतकºयांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी विमा कंपन्यांनी लवकरात लवकर प्रतिनिधी पाठवून नुकसानीचा आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधानांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत एक बैठक घेतली. उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि राज्याचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर वरील आदेश पंतप्रधानांनी जारी केले. चुनापूर विमानतळावर झालेल्या या बैठकीनंतर पंतप्रधान दिल्लीला परतले.
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बिहार सरकारला आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
मोदी यांनी बिहारातील चार जिल्ह्यांतील पूरस्थितीची हवाई पाहणी केली. त्यात पुर्णिया, कटिहार, किशनगंज, अरारिया यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हेही त्यांच्यासोबत होते.
पंतप्रधानांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, बिहारातील १९ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. त्यातील १३ जिल्ह्यांत नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. राज्याच्या जलस्रोत विभागाला सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे. नद्यांच्या काठांवर उभारण्यात आलेले कोट आणि सिंचन कालवे वाहून गेले आहेत. त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी २,७00 कोटी रुपये लागतील.
पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. आतापर्यंत २ हजार कोटी रुपयांचे मदत साहित्य पूरग्रस्तांना वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली.
केंद्रामार्फत
रस्त्यांची दुरुस्ती
मोदी यांनी सांगितले की, बिहारातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालय योग्य ती कार्यवाही करील.