कर्नाटकात कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या, एका महिन्यात 90 शेतक-यांनी संपवली जीवनयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 04:19 PM2017-08-19T16:19:13+5:302017-08-19T16:25:03+5:30
जुलै महिन्यात 90 हून जास्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे
बंगळुरु, दि. 19 - कर्नाटकात दुष्काळाला कंटाळून होणा-या शेतकरी आत्महत्या अजूनही सुरुच आहेत. अधिकृत माहितीनुसार, गेल्या जुलै महिन्यात 90 हून जास्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुखमंत्री सिद्धरमय्या यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी 8,165 कोटी रुपयांची कर्जमाफी करत असल्याचं जाहीर केलं होतं. राज्यातील 22 लाख शेतक-यांच्या डोक्यावरील कर्जाचं ओझं कमी करण्याच्या हेतूने ही कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. मात्र कर्जमाफीची घोषणा होऊनही शेतक-यांच्या आत्महत्या काही थांबत नसल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिलपासून ते 30 जून दरम्यान दिवसाला दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. मात्र जुलै महिन्यात परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. जुलै महिन्यात दिवसाला तीन शेतक-यांनी आत्महत्या केल्याचा रिपोर्ट आला आहे. गेल्या चार महिन्यात एकूण 297 शेतक-यांनी आत्महत्या केली असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद आहे.
सरकारने कर्जमाफीसाठी पावलं उचलली जात असल्याची घोषणा केली असली तरी शेतकरी आत्महत्या सत्र सुरुच आहे. 15 ऑगस्ट रोजी रमेश नावाच्या शेतक-याने विष पिऊन आत्महत्या केली होती. दुस-या दिवशी त्याचा मृत्यू झाला होता. रमेशच्या नावे एक एकर जमीन होती. सुरुवातीच्या तपासादरम्यान डोक्यावर दोन लाखाचं कर्ज असल्याने रमेशने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं. कृषी विभाग आणि स्थानिक अधिकारी रमेशच्या आत्महत्येचं नेमकं काय कारण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महिन्याच्या अखेरपर्यंत नेमकी माहिती हाती लागेल.
जुलै महिन्यात झालेल्या शेतकरी आत्महत्येमधील 50 टक्के आत्महत्या कावेरीजवळील परिसरात झाल्या आहेत. मंड्या, म्हैसूर, हासन आणि कोडागू येथे 48 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. 30 जूनपर्यंत मंड्या येथे एकूण आठ शेतक-यांनी आत्महत्या केली होती. 31 जुलैपर्यंत हा आकडा 29 वर पोहोचला. याचप्रमाणे म्हैसूर येथे मृतांचा आकडा 11 वरुन 25 वर पोहोचला आहे. हासन येथे जून महिन्यात सात शेतक-यांनी आत्महत्या केली. जुलै अखेरपर्यंत आत्महत्येचा आकडा 19 झाला होता. बागलकोट आणि बेळगावात जून महिन्यात सहा-सहा शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. जो आकडा नंतर अनुक्रमे 12 आणि 22 झाला.