लंकेश हत्या प्रकरणाच्या वार्तांकनावर अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिकनची लाज वाटते असं सांगत पत्रकाराचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 12:04 PM2017-09-08T12:04:40+5:302017-09-08T12:10:52+5:30
गौरी लंकेश हत्याप्रकरणी रिपब्लिक टिव्हीनं चुकीची भूमिका घेतल्याचा दावा करत चॅनेलची पत्रकार सुमन नंदीने राजीनामा दिला व फेसबुकच्या माध्यमातून चीड व्यक्त केली आहे.
मुंबई, दि. 8 - अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टिव्ही बातमीशी ईमान राखत नसल्याचा आरोप करत एका पत्रकारानं राजीनामा दिला आहे. गौरी लंकेश हत्याप्रकरणी रिपब्लिक टिव्हीनं चुकीची भूमिका घेतल्याचा दावा करत चॅनेलची पत्रकार सुमन नंदीने राजीनामा दिला व फेसबुकच्या माध्यमातून चीड व्यक्त केली आहे.
अत्यंत अप्रामाणिक सरकारची, म्हणजे भाजपा प्रणित केंद्र सरकारची बाजू घेत रिपब्लिक टिव्हीनं ज्या प्रकारे गौरी लंकेश यांच्या हत्येचं वृत्तांकन केलं ते शरम वाटणारं असल्याची चीड त्यांनी व्यक्त केली आहे. "भाजपा व आरएसएसच्या लोकांकडून धमक्या आल्यानंतर गौरी यांची निर्घृण हत्या झाली. अशा खुन्यांना प्रश्न विचारण्याऐवजी तुम्ही विरोधकांवर प्रश्नांचा भडीमार कसा काय करता? तुमची कामाप्रती निष्ठा कुठे गेली?" असा सवाल नंदी यांनी रिपब्लिक टिव्हीला विचारला आहे.
प्रस्थापितांविरोधात आवाज उठवणाऱ्या लंकेश यांची राहत्या घरी मंगळवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कट्टर उजव्या विचारसरणीविरोधात आवाज उठवण्यासाठी लंकेश प्रसिद्ध होत्या. त्यांची हत्या झाल्यानंतर पुन्हा एकदा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विरोधकांना कायदेशीर मार्गाने आपला आवाज मांडता येणार की नाही. का विरोधी मत व्यक्त केल्यावर थेट हिंसाचारास सामोरे जावं लागू शकतं असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
रिपब्लिकच्या वृत्तांकनाबाबत बोलताना नंदी यांनी सौदी अरेबिया व उत्तर कोरियाच्या सरकारी निर्बंधातील पत्रकारितेचा हवाला दिला आहे. या दोन देशांप्रमाणेच भारतातल्या पत्रकारितेची अवस्था होईल असा इशारा त्यांनी दिला आहे. जर लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभानं आपला आत्मा विकला तर समाजाची काय अवस्था होईल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. रिपब्लिकनसारख्या बेईमान संस्थेत काम केल्याबद्दल आपल्याला पश्चात्ताप होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.