आदित्य ठाकरेंमध्ये राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 12:39 PM2019-06-15T12:39:45+5:302019-06-15T12:48:50+5:30
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जोर लावून काम करत आहेत. शिवसेनेचे एक नेते असल्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी आपली कामं सुरू केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याकडे राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली - प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येला उद्धव ठाकरे 16 जून रोजी भेट देणार आहेत. अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (15 जून) पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जोर लावून काम करत आहेत. शिवसेनेचे एक नेते असल्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी आपली कामं सुरू केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याकडे राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी असं म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदारही उपस्थित राहणार आहेत.
राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठीही दौरा केला होता. तसेच त्या ठिकाणचे प्रश्न समजून घेतले होते. त्यामुळेच त्यांच्यामध्ये राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी राऊत यांनी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं असं राज्यातील जनतेला वाटतं. एका युवा नेतृत्वाच्या हातात राज्य द्यावं असं जनतेला वाटतं असं विधान केलं होतं. सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्विट करत शिवसेना-भाजपाच्या युतीवर भाष्य केलं होतं. त्यावेळी भाजपा आणि शिवसेनेत सत्तेचा 50-50 फॉर्म्युला ठरला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत तसं ठरलं आहे त्यामुळे जे या बैठकीत उपस्थित नव्हते त्यांनी वेगवेगळी विधान करुन युतीत बिघाड करु नये असा टोला हाणला होता.
संजय राऊत आणि अन्य शिवसेना नेतेही आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी मागणी करत आहेत. पक्षांतर्गत आदित्य ठाकरेंनी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणं सुरक्षित राहणार आहे याचा आढावा घेण्याचं कामही सुरू आहे. युवासेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलन, निवेदन देत अनेक महाविद्यालय निवडणुकींमध्ये स्वत:चं नेतृत्व सिद्ध केलं. त्यामुळे आदित्य ठाकरेंना शिवसेना नेतेपदी बढती देण्यात आली. आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. अद्याप अधिकृतरित्या शिवसेनेने आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढविण्यावर कोणतंही भाष्य केलं नाही. आदित्य ठाकरे यांनीही याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असं सांगून निवडणूक लढविण्याबाबत बोलणं टाळलं. आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवली तर ठाकरे घराण्यातील निवडणूक लढविणारे ते पहिलेच नेते असतील.
'मोदी आणि योगींच्या नेतृत्त्वात राम मंदिर बांधणार'https://t.co/AQPd9jtpLy#RamMandirpic.twitter.com/Vo0SOwQEsD
— Lokmat (@MiLOKMAT) June 15, 2019
'मोदी आणि योगींच्या नेतृत्त्वात राम मंदिर बांधणार'
लोकसभा निवडणुकांमध्ये युतीला मोठं यशही मिळालं आहे. त्यामध्ये शिवसेनेला 18 जागांवर विजय मिळाला आहे. आता 18 खासदारांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे रविवारी (16 जून) अयोध्येचा दौरा करणार आहेत. शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा कधीही राजकीय मुद्दा म्हणून समोर आणला नाही. तसेच प्रभू रामचंद्राच्या नावाने मतं मागितली नाहीत असं राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर अयोध्येत येणार असल्याचे वचन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. ते वचन पूर्ण करण्यासाठीच ते येथे येणार आहेत असंही त्यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी ''पहले मंदिर फिर सरकार' हा नारा आम्हीही दिला होता, मात्र पुलवामा येथे आपल्या जवानांवर हल्ला करण्यात आला. देशाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याने राम मंदिर निर्मितीचा मुद्दा आम्ही बाजूला ठेवला होता. आता मात्र स्पष्ट बहुमत मिळालं आहे केंद्रात मोदी सरकार आहे. हे सरकार राम मंदिराची निर्मिती नक्की पूर्ण करेल असा आम्हाला विश्वास वाटतो' असंही म्हटलं आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांचे ट्विट, उद्धव ठाकरेंची घेतली भेटhttps://t.co/TEu4RSBUvw#BJP#ShivSena
— Lokmat (@MiLOKMAT) June 15, 2019
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांचे ट्विट, उद्धव ठाकरेंची घेतली भेट
मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अनेक वावड्या उठत असतानाच, स्वत: मुख्यमंत्र्यांनीच ट्विट करुन याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस पक्षाध्यक्ष अमित शहा तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ते भेट घेणार आहेत. त्यानंतच विस्ताराबाबत जाहीर केले जाईल, तर अधिवेशनापूर्वी म्हणजेच रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.