राम रहीमला अटक झाल्यानंतर हिंसाचार माजवण्यासाठी डेराने दिले होते पाच कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 06:12 PM2017-09-07T18:12:56+5:302017-09-07T18:16:16+5:30
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कारप्रकरणी अटक करून दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीने मोठा खुलासा केला आहे. सीबीआय कोर्टाने राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर डेरा सच्चा सौदाने हिंसाचार भडकवण्यासाठी ५ कोटी रुपये दिल्याची माहिती एसआयटीने दिली आहे.
पंचकुला, दि. ७ - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कारप्रकरणी अटक करून दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीने मोठा खुलासा केला आहे. सीबीआय कोर्टाने राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर डेरा सच्चा सौदाने हिंसाचार भडकवण्यासाठी ५ कोटी रुपये दिल्याची माहिती एसआयटीने दिली आहे. पंचकुलामध्ये राम रहीमला झालेल्या अटकेनंतर पंचकुलामध्ये झालेलेल्या हिंसाचारामध्ये डेरा सच्चाशी संबंधित असलेले आदित्य इंन्सा, हनिप्रीत इन्सा आणि सुरिंदर धीमान इन्सा हे सहभारी असल्याचे समोर येत आहे.
डेरा सच्चा सौदाच्या पंचकुला शाखेचे प्रमुख असलेल्या चमकौर सिंह यांच्याकडे डेरा व्यवस्थापनाने पैसे खर्च करण्याची जबाबदारी सोपवल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे. पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील ढकोली गावातील रहिवासी असलेल्या चमकौर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असून, गुन्हा दाखल झाल्यापासून तो फारार आहे. पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर त्याच्याविरोधात २८ ऑगस्टला देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता.
पंचकुलासोबतच पंजाबच्या अन्य भागातही लोकांना भडकवण्यासाठी डेरा सच्चा सौदाकडून पैसे खर्च करण्यात आले होते. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचारात प्राण गेल्यास परिवाराला आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासनही अनुयायांना देण्यात आल्याचे एसआयटीच्या चौकशीत समोर आले आहे. आता चमकौरला अटक केल्यानंतरच यासंदर्भातील अधिक माहिती मिळू शकेल, असे हरयाणाचे डीजीपी बी.एस. संधू यांनी सांगितले आहे.
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम याला बलात्काराच्या आरोपाबद्दल सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवताच पंजाब व हरयाणात त्याच्या समर्थकांनी ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेक सुरू केली होती. त्यांनी २00 हून अधिक वाहने, अनेक रेल्वे स्थानके, पेट्रोल पंप, टेलिफोन एक्स्चेंज, प्राप्तिकर कार्यालय, दूध प्रकल्प यांना आग लावली. दिल्लीत एका ट्रेनच्या बोगीही पेटवली. या हिंसाचारामुळे पोलीस व सुरक्षा दलांनी तिथे आधी लाठीमार, नंतर पाण्याचा मारा व अश्रुधूर सोडला. तरीही हा जमाव त्यांच्या अंगावर येत होता. त्यामुळे अखेर केलेल्या गोळीबारात ३८ हून अधिक जण ठार व २५0 हून अधिक लोक जखमी झाले होते.
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दोषी ठरवल्यानंतर झालेला हिंसाचार लक्षात घेत त्याला तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावण्यात आली. निकाल सुनावण्यासाठी न्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतकच्या तुरुंगात आणण्यात आलं होतं. राम रहीम कोर्टरुममध्ये हात जोडून उभा असून दयेसाठी याचना करत होता. इतकंच नाही तर रडूही लागला होता. 2002मध्ये हे प्रकरण उजेडात आले होते.