'फनी' वादळानंतर मोदी सरकारला 'नवीन' बळ; सत्तेचं गणित होणार सोपं?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 12:37 PM2019-05-14T12:37:02+5:302019-05-14T12:42:15+5:30
दोन मोठे नेते निकालाआधीच एकमेकांचं कौतुक करू लागल्यानं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा आता फक्त शेवटचा टप्पा उरलाय. १९ मे रोजी आठ राज्यांमधील ५९ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा धुरळा उडतोच आहे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतच आहेत. असं असताना, निवडणुकीच्या मैदानात आमनेसामने उभे ठाकलेले दोन मोठे नेते निकालाआधीच एकमेकांचं कौतुक करू लागल्यानं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. या 'नवीन' समीकरणाला कारणीभूत ठरलं आहे, ते फनी चक्रीवादळ.
गेल्या शुक्रवारी फनी चक्रीवादळानं ओडिशामध्ये हाहाकार उडवला. या चक्रीवादळात ४१ जणांचा मृत्यू झाला असून मोठी वित्तहानीही झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिस्थितीची हवाई पाहणी करून १ हजार कोटींची तातडीची मदतही जाहीर केली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळतंय.
फनी चक्रीवादळाआधी नागरिकांच्या स्थलांतराचे आणि नंतर मदत आणि पुनर्वसनाचे काम ओडिशा सरकारने उत्तम प्रकारे केल्याचं प्रशस्तीपत्रक नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनायक यांना दिलं होतं. त्यांच्या या पत्राला पटनायक यांनी उत्तर पाठवलंय आणि त्यात केंद्राचे आभार मानलेत. गरजेच्या वेळी राज्याच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या रणसंग्रामात एकमेकांवर टीकास्त्र सोडणाऱ्या या दोन नेत्यांमधील हे कौतुकाचे बोल भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकतात, असं जाणकारांना वाटतंय.
फनी वादळावर या मराठमोळ्या अधिकाऱ्याचा 'विजय' : वाचवले तीन लाख नागरिकांचे प्राण
लोकसभा निवडणुकीत बहुतांश प्रादेशिक पक्षांनी आपला गट जाहीर केला आहे. परंतु, बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक यांनी आपले पत्ते उघडलेले नाहीत. गेल्या वेळी ओडिशातील २१ पैकी २० खासदार बीजेडीचे होते. यावेळीही त्यांना तसंच यश मिळेल, असा अंदाज आहे. त्यामुळे लोकसभा त्रिशंकू झाल्यास त्यांची भूमिका निर्णायक असेल. बीजू जनता दलाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत कधीच नवीन पटनायक यांनी काँग्रेसशी 'हात'मिळवणी केलेली नाही. परंतु, यावेळच्या निवडणुकीत ते भाजपापासूनही दूरच राहिले होते. या पार्श्वभूमीवर, मोदी आणि पटनायक यांच्यातील पत्रव्यवहार, भले औपचारिक असला तरी मैत्रीचे पूल बांधणारा ठरू शकतो.
#CycloneFaniफनी वादळाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी केंद्राची 1 हजार कोटींची मदत जाहीर @narendramodihttps://t.co/Kq6V3uN8Iu
— Lokmat (@MiLOKMAT) May 6, 2019
दरम्यान, फनी चक्रीवादळाचा तडाखा अनेक भागांना बसलाय. सुमारे ५ लाख घरांचं नुकसान झालंय. ही घरं बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निधी देण्याची विनंती नवीन पटनायक यांनी केली आहे. या योजनेतील नव्या तरतुदीनुसार, घरबांधणीचा ९० टक्के खर्च केंद्र सरकार देतं. आता पंतप्रधान ही विनंती मान्य करून जवळीक आणखी वाढवतात का, हे पाहावं लागेल.
Cyclone Fani : फनी चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार, 41 जणांचा मृत्यूhttps://t.co/xaLpWxYBjn#CycloneFani
— Lokmat (@MiLOKMAT) May 9, 2019