...अन् ती स्वगृही परतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:46 AM2017-08-18T05:46:46+5:302017-08-18T05:46:56+5:30
मुंबईत हरवले तर कोणी सापडत नाही, याच संभ्रमातून मध्य प्रदेशातील एका विवाहित महिलेला तिच्या पतीने मुंबईत येणा-या एक्स्प्रेसमध्ये बसवून सोडून पळ काढला होता.
ठाणे : मुंबईत हरवले तर कोणी सापडत नाही, याच संभ्रमातून मध्य प्रदेशातील एका विवाहित महिलेला तिच्या पतीने मुंबईत येणा-या एक्स्प्रेसमध्ये बसवून सोडून पळ काढला होता. मात्र, त्या महिलेने न डगमगता आलेल्या परिस्थितीला तोंड दिल्याने रेल्वे प्रशासन आणि ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने ती पुन्हा स्वगृही परतली आहे.
ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात चौकशी किंवा इतर गोष्टींसाठी नेहमी प्रवासी धाव घेत असतात. त्याचप्रमाणे शनिवारी रात्रीच्या वेळेस एक हिंदी भाषिक २५-२६ वर्षीय रेखा (नाव बदलले) ही महिला प्रबंधक कार्यालयात रडतरडत हाती पाण्याची बाटली घेऊन धडकली. त्या वेळी तिच्याजवळ कोणतीही बॅग किंवा पैसेही नव्हते. नवºयाची भेट होत नसल्याचे सांगून त्याचा शोध घेण्यासाठी ती विनंती करत होती. त्यानुसार, रेल्वे स्थानकात तिच्या नवºयाच्या नावाने स्पीकरवर माहिती दिली जात होती. पण १५ ते २० मिनिटांचा वेळ होऊनही कोणी येत नसल्याने ठाण्यापाठोपाठ कुर्ला, दादर आणि सीएसटी या रेल्वे स्थानकांतही त्याची माहिती स्पीकरवर दिली गेली. तरी, त्याच्याबद्दल काही कळत नसल्याने तिचा धीर हळूहळू सुटू लागला. तिची समजूत काढून मोबाइल नंबर किंवा कोणी मुंबईत राहत आहे का, याची माहिती विचारल्यावर तिने नवºयाकडे किंवा आपल्याकडे मोबाइल नसल्याचे स्पष्ट केले. पण, आपल्या दिराकडे मोबाइल असून, तो नंबर तिने आठवून सांगितला. त्यानुसार, उपप्रबंधक रवी नांदूरकर यांनी त्या नंबरवर संपर्क साधला. त्या वेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे देत फोन कट केला.
याचदरम्यान, तिने मध्य प्रदेशात मीना येथील रहिवासी असल्याचे सांगितले. तसेच ती नवºयासोबत बोरीवली येथे नातेवाइकाकडे पैसे घेण्यासाठी येत होती. त्यासाठी मध्य प्रदेश येथून सचखंड एक्स्प्रेसमध्ये बसून नांदेड येथे ते दोघे उतरले. तेथून तिला नवºयाने मनमाड-गुवाहाटी लोकमान्य टिळक टर्मिनसच्या महिला डब्यात बसवून तिला ठाणे स्थानकात उतरण्यास सांगितले. त्याचप्रमाणे ती ठाण्यात उतरली होती.
>त्या महिलेचा दीर दाद देत नसल्याने ही बाब ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी त्यावर संपर्क साधून दुसºया दिवशी त्या महिलेला गाडीत बसवून स्वगृही पाठवले.
- एस.बी. महिदर,
रेल्वे प्रबंधक, ठाणे स्थानक