दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कराच्या जवानांनी काश्मीरमध्ये नऊ गावांना घातला घेराव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 10:56 AM2017-08-19T10:56:18+5:302017-08-19T11:02:32+5:30
जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यातील नऊ गावांभोवती सुरक्षा पथकांनी घेराव घालून शोध मोहिम सुरु केली आहे.
शोपियन, दि. 19 - जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यातील नऊ गावांभोवती सुरक्षा पथकांनी घेराव घालून शोध मोहिम सुरु केली आहे. या गावांमध्ये दहशतवादी दडून बसल्याची शक्यता असल्याने लष्कराकडून शोध मोहीम राबवण्यात येत आहे. चाकूरा, मंत्रीबग, झायपोरा, प्रताबपोरा, ताकीपोरा, रानीपोरा, रत्नीपोरा, दनगाम आणि वनगाम या गावांमध्ये सुरक्षा पथकाचे जवान दहशतवाद्यांचा कसून शोध घेत आहेत.
लष्कराने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली असून, मागच्या दोन महिन्यात लष्कराच्या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 2022 पर्यंत काश्मीर समस्येवर तोडगा निघेल असे वक्तव्य केले. नवीन भारत घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यापूर्वी नक्षलवाद, दहशतवाद आणि काश्मीर समस्येवर तोडगा निघालेला असेल असे राजनाथ सिंह म्हणाले.
लष्कराची मोठी कारवाई, सहा महिन्यात 92 दहशतवादी ठार
काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली असून त्याचा प्रभावही दिसू लागला आहे. यावर्षी 2 जुलैपर्यंत जवानांनी जवळपास 92 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. 2016 मध्ये जुलैपर्यंतची आकडेवारी पहायला गेल्यास हा आकडा 79 इतका होता. दहशतवादी विरोधी कारवाईत यावर्षी खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 2012 आणि 2013 मधील वार्षिक आकडेवारीपेक्षाही जास्त आहे. त्यावेळी युपीए सरकार सत्तेत होतं.
लष्कराला मोठं यश
जम्मू काश्मीरमध्ये 2012 रोजी 72 तर 2013 मध्ये 67 दहशतवादी ठार करण्यात आले होते. एनडीएच्या कार्यकाळात 2014 मध्ये हा आकडा वाढून 110 वर पोहोचला. 2015 मध्ये एकूण 108, तर 2016 मध्ये 150 दहशतवादी मारले गेले. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, "यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार केल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या 2014 आणि 2015 मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकड्यापेक्षा थोडी कमी आहे". दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या चोख कारवाईचं श्रेय लष्कर, केंद्रीय दलं, राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणांमधील उत्तम समन्वयाचं आहे. यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश आहे. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितल्यानुसार, "सुरक्षा जवानांना खो-यात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन, त्यांचा खात्मा करण्यासाठी मोकळीक दिली आहे.