अरविंद केजरीवाल यांची चोरी गेलेली कार सापडली, कारमध्ये सापडली तलवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 10:16 AM2017-10-14T10:16:14+5:302017-10-14T11:02:32+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चोरीला गेलेली निळ्या रंगाची वॅगन-आर (Wagon R) कार पोलिसांना सापडली आहे. दिल्ली सचिवालयाच्या बाहेरुन ही कार चोरीला गेली होती.
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चोरीला गेलेली निळ्या रंगाची वॅगन-आर (Wagon R) कार पोलिसांना सापडली आहे. दिल्ली सचिवालयाच्या बाहेरुन ही कार चोरीला गेली होती. गाझियाबादच्या मोहननगरमधून पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. पोलिसांना कारमध्ये तलवार सापडली आहे. 'त्याच रंगाची आणि मॉडेलची कार आम्हाला गाझियाबादमध्ये सापडली आहे. आम्ही इंजिन आणि इतर गोष्टी तपासत आहोत', अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्विकारण्यापूर्वी अरविंद केजरीवाल या कारचा वापर करत होते. २०१३ मध्ये दिल्लीचे ४९ दिवसांचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हीच कार वापरली होती. भ्रष्ट्राचारविरोधी आंदोलनावेळी केजरीवाल यांनी या आयकॉनिक कारचा सर्वाधिक वापर केला होता. त्यानंतर त्यांनी ही कार हरयाणातील आम आदमी पार्टीचे नेते नवीन जयहिंद यांना वापरायला दिली होती. आपल्या कॉमन मॅन इमेजला साजेशी गाडी म्हणून या कारचा केजरीवाल वापर करत. सध्या आम आदमी पक्षाच्या मीडिया सेलकडून या कारचा वापर होत होता. केजरीवाल सध्या इनोव्हामधून फिरतात.
Blue Wagon R car which was earlier used by Arvind Kejriwal and had been stolen on Oct 12 has been recovered from Ghaziabad pic.twitter.com/MFgvvrUdWe
— ANI (@ANI) October 14, 2017
गुरुवारी दिल्ली सचिवालयाच्या बाहेरुन वॅगन-आर चोरी झाली होती. सचिवालयाबाहेर कार पार्क करण्यात आली आहे. रात्री एक वाजता कार आपल्या जागेवर नसून, चोरी झाल्याचं लक्षात आलं.
2015 रोजी केजरीवाल यांची ही कार चर्चेत आली होती. आम आदमी पक्षाचे समर्थक कुंदन शर्मा यांनी 2013 रोजी ही कार केजरीवाल यांना गिफ्ट म्हणून दिली होती. मात्र आम आदमी पार्टीतून प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना काढल्यामुळे केजरीवाल यांच्यावर नाराज झालेल्या कुंदन शर्मा यांनी ही कार परत मागितली होती.