आसाराम बापू हे संतच - राजस्थानच्या पाठ्यपुस्तकातील वादग्रस्त उल्लेख
By admin | Published: August 2, 2015 12:28 PM2015-08-02T12:28:29+5:302015-08-02T12:28:42+5:30
राजस्थानमध्ये तिसरी इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात आसाराम बापू हे स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा, रामकृष्ण परमहंस यांच्यासारखेच संत आहेत असा वादग्रस्त उल्लेख करण्यात आला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. २ - बलात्कार प्रकरणामुळे कथित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू हे सध्या तुरुंगात असले तरी राजस्थानमध्ये तिसरी इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात आसाराम बापू हे स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा, रामकृष्ण परमहंस यांच्यासारखेच संत आहेत असा वादग्रस्त उल्लेख करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकातील या वादग्रस्त उल्लेखावर शिक्षणप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला असून जिल्हा प्रशासनाने याप्रकरणाची अद्याप माहिती मिळालेली नाही अशी प्रतिक्रिया देत प्रकरणावर भाष्य करणे टाळले आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापू हे सध्या तुरुंगात आहे. मात्र राजस्थानमधील तिसरी इयत्तेचे पाठ्यपुस्तक करणा-या मंडळींना याचा विसर पडला असावा. या पाठ्यपुस्तकात आसाराम बापूंचा थेट स्वामी विवेकानंद, महर्षी दयानंद, रामकृष्ण परमहंस, मदर तेरेसा या दिग्गज्जांच्या रांगेत बसवण्यात आले आहे. आसाराम बापू हे भारताती थोर संत आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे. दिल्लीतील नया उजाला प्रकाशन संस्थेने या पुस्तकाचे प्रकाशन केले असून या पुस्तकाला एनसीईआरटीची मंजुरी असल्याचा दावाही पुस्तकात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आसाराम बापूंचे धडे देत नेमके काय साध्य करायचे आहे, विद्यार्थ्यांसमोर कोणाचा आदर्श ठेवायचा असा संतप्त सवाल राजस्थानमधील शिक्षणप्रेमींनी उपस्थित केला आहे.