Atal Bihari Vajpayee : जगाला भारतशक्ती दाखविणारा अटल नेता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 04:03 AM2018-08-17T04:03:51+5:302018-08-17T04:03:58+5:30
भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधानांमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचा समावेश होतो. कारण त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्वच तसे होते. त्यांचा राजकीय प्रवास आदर्शवत आहे.
भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर नवीन ओळख निर्माण करून देण्यात आणि जगावर भारताचा ठसा उमटविण्यात माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांचा वाटा सिंहाचा आहे. त्यांनी घेतलेला अण्वस्त्र चाचणीचा निर्णय, कारगिल युद्धात पाकिस्तानला दिलेला शह आणि आर्थिक सुधारणांचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांनी सुरू ठेवलेल्या उपाययोजना भारतासाठी आजही फायद्याच्या ठरत आहेत. भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधानांमध्येअटलबिहारी वाजपेयी यांचा समावेश होतो. कारण त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्वच तसे होते. त्यांचा राजकीय प्रवास आदर्शवत आहे.
ध्य प्रदेशातील ग्वाल्हेरजवळील लष्कर येथे जन्मलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी संपादन केली होती. कॉलेज जीवनातच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता. विद्यार्थी संघटनांचे काम करता करता त्यांनी राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे काम करण्यास सुरुवात केली. कॉलेजमधील विद्यार्थी संघटनेचे सचिव आणि उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले आणि येथूनच त्यांच्या नेतृत्वाचा उदय झाला.
वाजपेयी यांचा राजकारणाशी पहिला संबंध आला तो १९४२ मध्ये. भारत छोडो चळवळीच्या निमित्ताने ते राजकारणात आले. त्यानंतर ते श्याम प्रसाद मुखर्जी आणि अर्थातच भारतीय जनसंघाच्या संपर्कात आले. तेव्हापासूनच त्यांची भारतीय जनसंघाचे नेते म्हणून कारकीर्द सुरू झाली. वाजपेयी १९५७ मध्ये संसदेवर बलरामपूरमधून निवडून आले. आपल्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षात असूनही तरुणपणातच सर्व स्तरावर वाहवा मिळविली. लोकसभेतील त्यांची भाषणे अतिशय उत्तम, दर्जेदार आणि तेवढीच अभ्यासपूर्ण असत.
जनता पक्षाचे सरकार जास्त दिवस टिकले नाही. अंतर्गत विरोधामुळे जनता पक्षाची शकले झाली. मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला. त्यानंतर उदयास आली ती भारतीय जनता पार्टी. राष्टÑीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघातील काही मित्रांनी मिळून भाजपाची स्थापना केली.
लालकृष्ण आडवाणी आणि भैरोसिंग शेखावत आणि वाजपेयी यांनी १९८०साली भाजपाची स्थापना केली. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सरकारला जेरीस आणणाऱ्या भाजपाचे पहिले राष्टÑीय अध्यक्ष होण्याचा मानही वाजपेयींना मिळाला होता. एवढ्या मोठ्या पक्षाची सुरुवात केवळ दोन खासदारांनी झाली, तरीही भाजपा हा देशाच्या मुख्य प्रवाहात राहिला आणि वाजपेयी हेच पक्षाच्या केंद्रस्थानी राहिले. गुजरात काबीज केल्यानंतर हिंदू आणि राम या दोन मुद्द्यांवर भाजपाने पुन्हा एकदा मुसंडी मारण्यास सुरुवात केली. मुंबई येथे नोव्हेंबर १९९५ मध्ये झालेल्या अधिवेशात आडवाणी यांनी लोकसभा निवडणुकांसाठी, पंतप्रधानपदासाठी वाजपेयी यांनाच उमेदवार म्हणून घोषित केलो. त्याचा मोठा फायदा पक्षाला झाला होता. त्यानंतरच पक्षाने काँगे्रसला खºया अर्थाने शह देण्यास सुरुवात केली होती.
१९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा १६२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होतो़ त्यामागेही वाजपेयीच होते. त्या वेळी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखालीच निवडणूक लढविल्या गेल्या होत्या. त्यावेळी त्रिशंकु लोकसभा राहिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेसाठी वाजपेयींना निमंत्रण मिळाले. त्यांनी पंतप्रधानपदाची शपथही घेतली. परंतु विश्वासमत प्रस्ताव चर्चेवेळी त्यांना इतर पक्षांकडून पाठिंबा मिळविणे शक्य झालो नाही. त्यामुळे त्यांना १३ दिवसांतच पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर १९९६ ते १९९८ दरम्यान तिसºया आघाडीला सरकार स्थापनेच्या दोन संधी मिळाल्या. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल भारताचे पंतप्रधान झाले. ही दोन्ही सरकारे लवकरच कोसळली.
१९९८च्या निवडणुकीत भाजपा पुन्हा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. या वेळी वाजपेयींनी राष्टÑीय लोकशाही आघाडीची स्थापना केली. पण अखेर १९९८च्या अखेरीस अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकार पुन्हा एका मताने कोसळले. विरोधकही सरकार स्थापन करू शकले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुका झाल्या आणि पु्न्हा वाजपेयी सरकारच आले. या काळात वाजपेयींनी आपल्या कणखरतेची छाप साºया जगावर सोडली होती. मे १९९८ मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली ५ अणुचाचण्या घेतल्या. सत्ता प्राप्त केल्यावर केवळ एका महिन्यातच त्यांनी जगाला आपली ताकद दाखवून दिली.
असे होते बहुआयामी व्यक्तिमत्त्व
नाव : अटलबिहारी वाजपेयी
वडिलांचे नाव : स्व. श्री कृष्णबिहारी वाजपेयी
आईचे नाव : स्व. श्रीमती कृष्णादेवी
प्रेरणास्थान - वडील, गोळवलकर गुरुजी, भाऊराव देवरस, पंडित दीनदयाल उपाध्याय
अविस्मरणीय क्षण : संयुक्त राष्टÑ महासभेत प्रथमच हिंंदीत भाषण.
कटु अनुभव : पाचवीत असताना खोडी काढली म्हणून शिक्षकांनी मारले होते.
यशाच्या मागे कोण : नशिबाला मानत.
रोमांचक क्षण : १. अल्पमतात असतानाही राष्टÑपती डॉ. शंकरदयाल शर्मा यांनी सरकार स्थापनेचे आमंत्रण दिले. २. एक मताने लोकसभेत सरकारचा पराभव.
दुखद क्षण : पंडित दीनदयाल
उपाध्याय यांचा मृत्यू.
मित्र : भैरोसिंग शेखावत,
लालकृष्ण अडवाणी, अप्पा घटाटे,
जसवंतसिंग, डॉ. मुकुंद मोदी, शिवकुमार.
आवडता राजकीय नेता : जवाहरलाल नेहरू.
आवडता लेखक : शरत्चंद्र/प्रेमचंद
आवडता कवी : हरिवंशराय बच्चन, शिवमंगलसिंग ‘सुमन’, रमानाथ अवस्थी, सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’, बालकृष्ण शर्मा ‘नवीन’, जगन्नाथ प्रसाद मिलिंद, फैज अहमद फैज.
आवडते शास्त्रीय कलाकार : पं. भीमसेन जोशी, अमजद अली खान, हरिप्रसाद चौरसिया.
आवडते गायक : लता मंगेशकर, मुकेश, मोहम्मद रफी.
संगीतकार : सचिन देव बर्मन
अभिनेता : संजीवकुमार, दिलीपकुमार
अभिनेत्री : सुचित्रा सेन, राखी, नूतन
जेवण : खिचडी, पुरी कचोरी, दही पकोडा, मंगोडी, मुगाचे वरण, मालपुए, पराठा
पोशाख : धोतर-कुर्ता, बंदगळ्याचा कोट, खासदार झाल्यानंतर चुडीदार पायजमा, शेरवानी, पठाणी सूट.
चित्रपट : मौसम, ममता, आंधी, बंदिनी, देवदास, तिसरी कसम