Atal Bihari Vajpayee: अटलबिहारींचा 'आठ'वावा प्रताप; या गोष्टींसाठी सदैव ऋणी राहील भारत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 05:50 PM2018-08-16T17:50:53+5:302018-08-16T17:51:21+5:30

Atal Bihari Vajpayee: पंतप्रधानपदाच्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताला दिलेल्या आठ अशा गोष्टी, ज्यासाठी देश कायम त्यांचा ऋणी राहील.... 

Atal Bihari Vajpayee: Here Are 8 Achievements Of Atal Bihari Vajpayee That We Should Never Forget | Atal Bihari Vajpayee: अटलबिहारींचा 'आठ'वावा प्रताप; या गोष्टींसाठी सदैव ऋणी राहील भारत!

Atal Bihari Vajpayee: अटलबिहारींचा 'आठ'वावा प्रताप; या गोष्टींसाठी सदैव ऋणी राहील भारत!

Next

नवी दिल्लीः माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं देशाचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त होतेय. कारण, देशहितासाठी त्यांचं योगदान अतुलनीय होतं. पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी भारताला दिलेल्या आठ अशा गोष्टी, ज्यासाठी देश कायम त्यांचा ऋणी राहील....  

१. शिक्षणाच्या अधिकाराचा रचला पाया


शिक्षणाचा अधिकार काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात अंमलात आला असला, तरी त्याची मुहूर्तमेढ अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना रोवली गेली होती. ६ ते १४ या वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देणारं सर्व शिक्षा अभियान त्यांनी सुरू केलं होतं.   

२. भारताला बनवलं अण्वस्त्रसज्ज राष्ट्र


अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता आणि सगळ्याच देशांना भारताची ताकद दाखवून देण्याच्या उद्देशानं अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारने १९९८ मध्ये राजस्थानातील पोखरण इथे अणुचाचणी केली होती. अर्थात, हे अस्त्र भारत प्रथम वापरणार नाही, तर केवळ प्रत्युत्तरादाखल वापरेल, अशी भूमिकाही तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींनी जाहीर केली होती. 

३. दूरसंचार-दूरसंवाद क्रांतीच्या पाठीशी वाजपेयींची दूरदूष्टी 


देशातील दूरसंचार क्रांतीचा पाया भले माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या काळात रचला गेला, पण अटलबिहारी वाजपेयींनी या क्षेत्राला खऱ्या अर्थाने 'अच्छे दिन' दाखवले. अनेक जाणकारही भारतातील मोबाईल क्रांतीचं श्रेय अटलबिहारींना देतात.

४. भूकंप, चक्रिवादळातही जीडीपी भक्कम


अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देशावर अनेक संकटं आली. एक प्रलयंकारी भूकंप, दोन चक्रिवादळं, ३० वर्षांतील भीषण दुष्काळ, गल्फ वॉर 2, कारगिल युद्ध आणि संसदेवर हल्ला झाला. परंतु, वाजपेयींच्या कणखर नेतृत्वामुळे जीडीपीला धक्का बसला नाही.

५. मैत्री महासत्तांशी अन् शेजाऱ्यांशी


इस्रायलसोबत राजनैतिक आणि लष्करी सहकार्यासाठी पुढाकार घेऊन अटलबिहारी वाजपेयींनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं होतं. त्यानंतर, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भारतभेटीनं आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचं वजन वाढलं. पाकिस्तानशी मैत्रीचे प्रामाणिक प्रयत्नही अटलबिहारींनी केले होते. दिल्ली-लाहोर बससेवा हे त्याचं प्रतीक होतं. पण, पाकिस्तानने दगा दिला होता. 

६. मेट्रो आली हो अंगणी... 


दिल्ली मेट्रो प्रकल्पाला मंजुरी आणि पहिल्या लाइनचं उद्घाटन अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात झालं होतं. 

७. चांद्रयान-१... देश पोहोचला चंद्रावर


देश २००८ पर्यंत चंद्रावर जाण्यासाठी सज्ज होईल, अशी घोषणा अटलबिहारी वाजपेयी यांनी १५ ऑगस्ट २००३ रोजी केली होती.  चांद्रयान-1 प्रकल्पावर त्यांनीच स्वाक्षरी केली होती. त्यानंतर, इस्रोने मागे वळून पाहिलेलं नाही. 

८. देश जोडणारा सुवर्ण चतुष्कोण
भारतातील सर्वात मोठा व जगातील ५व्या क्रमांकाचा रस्तेबांधणी प्रकल्प म्हणजे सुवर्ण चतुष्कोण. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाची घोषणा केली. 
 

Web Title: Atal Bihari Vajpayee: Here Are 8 Achievements Of Atal Bihari Vajpayee That We Should Never Forget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.